राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा, साहित्य या सर्वच क्षेत्रात अगदी सहजपणे वावरणारे दिलखुलास, सुस्वभावी, संयमी आणि तितकेच क्रियाशील व्यक्तिमत्त्व मोईज नईमोद्दीन शेख म्हणजेच सर्वांचे आवडते मोईजभाई शेख यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. मोईजभाईंचे समाजभान सतत जागृत असायचे. लातूरच्या सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना कोणाचीही कोणाबद्दल कटूता, असुया राहू नये, यासाठी ते सातत्याने कार्यरत राहिले. आज त्यांच्या जाण्याने लातूरच्या सामाजिक क्षेत्रातील ‘समझोता एक्सप्रेस’ थांबली आहे.
विकासरत्न विलासराव देशमुख यांचे अत्यंत विश्वासू व्यक्तिमत्त्व म्हणजे मोईजभाई शेख. ते माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासोबतही त्यांचे खंदेसमर्थक म्हणून कार्यरत राहिले. माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांच्यासोबतही ते सावलीसारखे राहिले. काँग्रेस पक्षात लातूर शहराध्यक्षापासून ते प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदापर्यंत त्यांचा प्रवास राहिला. तत्कालीन लातूर नगर परिषदेचे दोनदा उपनगराध्यक्ष राहिलेले मोईजभाई शेख यांनी विविध क्षेत्रातील खूप मोठे सहकारी, मित्र जोडले. पक्षीय राजकारणाच्या पलिकडे जाऊन त्यांनी विविध क्षेत्रात योगदान दिलेले आहे. प्रत्येक समाज आणि संस्कृतीमध्ये सहज एकरुप होणारे मोईजभाई एक असामान्य व्यक्तिमत्त्वाचे धनी होते.
शिव छत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानीत मोईजभाई शेख यांनी क्रीडा क्षेत्राला विशेषत: व्हॉलिबॉल या खेळाला नेहमीच प्रोत्साहन देण्याचे कार्य केले आहे. ते स्वत: एक दर्जेदार व्हॉलिबॉल खेळाडू होते. त्यांनी असंख्य व्हॉलिबॉलपटू घडवले. तालुकास्तरापासून ते राज्यस्तरीय व्हॉलिबॉल स्पर्धा त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. राज्यभरातील व्हॉलिबॉल खेळाडूंना घडवणे, त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांना खेळण्याची संधी देणे, नवोदीत खेळाडूंसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे, खेळाडूंना पायाभूत सुविधा मिळवून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील राहिले. लातूर जिल्हा व्हॉलिबॉल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांनी असंख्य खेळाडू घडवले. त्यांनी घडवलेल्या अनेक व्हॉलिबॉल खेळाडूंनी देश-विदेशात जाऊन लातूरचे नाव उज्ज्वल केलेले आहे. त्यांनी सॉफ्टबॉल, बुद्धीबळ, यासह क्रीडा क्षेत्राशी संबंधीत विविध संस्थांवर, असोसिएशनवर पदाधिकारी म्हणून कार्य केले आहे. निर्मलादेवी काळे शिक्षण संस्थेचे सचिव, चंद्रभानू सोनवणे शिक्षण संकुलाचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत राहिले.
मोईजभाई यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष पैलू म्हणजे विविध क्षेत्रांतील लोकांशी त्यांनी जपलेले आत्मिय संबंध, मित्रत्वाचे नाते. त्यांच्या आपुलकीच्या स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्र परिवार निर्माण झाला आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरुन निघणे निश्चितच कठीण आहे. त्यांच्या कार्याची आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची आठवण लातूरच्या जनमानसांत तसेच क्रीडा क्षेत्रात कायम राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
-एजाज शेख, लातूर
















