मुंबई : प्रतिनिधी
उद्धव ठाकरेंसोबत युतीबाबतच्या बातम्यांवरून राज ठाकरे चांगलेच संतापले आहेत. राजकीय विधान करायचं असेल तर अधिकृत पत्रकार परिषद घेईन असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असेही ते म्हणाले. सोशल मीडियावरचा धिंगाणा पत्रकारितेत येऊ नये असे ते म्हणाले. यासंदर्भात राज ठाकरेंनी एक पोस्ट केली आहे.
१४ आणि १५ जुलै २०२५ ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवडक पदाधिका-यांसाठी इगतपुरी येथे शिबिर आयोजित केले होते. त्या शिबिराच्या दरम्यान माझा पत्रकारांशी अनौपचारिक संवाद झाला. त्या दरम्यान मला ५ जुलैच्या विजयी मेळाव्याबद्दल विचारण्यात आले. त्यावर मी तो मेळावा राजकीय नव्हता तर तो मराठी माणसाच्या विजयाचा मेळावा होता. त्यावर मग युतीचं काय? असे विचारण्यात आले, त्यावर मी त्यांना युतीच्या चर्चा तुमच्याशी करायच्या का आता? असे उत्तर दिले.
त्यानंतर काल काही इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी आणि निवडक माध्यमांनी, मी न बोललेले शब्द माझ्या तोंडात घातले की युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांच्या आधीची परिस्थिती बघून घेतला जाईल. ही कुठली नवीन पत्रकारिता जन्माला आली आहे? अनौपचारिक गप्पा या अनौपचारिक ठेवायच्या असतात, आणि त्यातलं काही प्रसिद्ध केलंच तर जे बोललं नाही ते समोरच्याच्या तोंडात घालायचं नसतं हे भान पण आता गेलं आहे का?
कोणाच्यातरी आहारी जाऊन किंवा सांगण्यावरून पत्रकारिता करायची हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडला आहे, हे आमच्या लक्षात येत नाहीये असं समजू नका. तुम्हाला काहीतरी रोज बातम्या हव्यात किंवा कोणाला तरी काही बातम्या हव्यात म्हणून आम्ही काय सतत बोलत राहावं का? आणि आज काही नाही मिळालं तर तयार करा बातम्या, हा कोणता प्रकार आहे पत्रकारितेचा? सोशल मीडियावर ज्याप्रकारचा धिंगाणा चालू आहे तो प्रकार पत्रकारितेत येऊ नये हीच अपेक्षा!