लातूर : प्रतिनिधी
स्वत:ला रिकामा वेळ मिळाला तर त्याची छंदामध्ये गुंतवणूक करा. तुम्ही जे काम करत आहात ते उत्तमोत्तम कसे होईल यासाठी प्रयत्न करा. युवतींनी आपली ऊर्जा उद्योग व्यवसायामध्ये गुंतवली तर भविष्यात चांगले अवॉर्ड मिळू शकते, असे प्रतिपादन उद्योजिका मृणाल कुलकर्णी यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि भारत शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित जयक्रांती महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ स्तरीय युवती नेतृत्व कार्यशाळा २०२४-२५ नुकतीच संपन्न झाली. या विद्यापीठस्तरीय युवती कार्यशाळेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या परिक्षेत्रातील लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी अशा चार जिल्ह्यातील १२० युवतीनी त्यामध्ये सहभाग नोंदवला. या कार्यशाळेच्या दुस-या दिवशी उद्योग क्षेत्रातील नेतृत्व या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. प्रज्ञा कांबळे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. अशोक मोटे, जिल्हा समन्वयक डॉ. केशव अलगुले, डॉ. प्रमोद चव्हाण उपस्थित होते.
उद्योग व्यवसाय करताना उद्योगाचा पाया असलेल्या मार्केटिंगचा पण अभ्यास करावा. तसेच युवतीनो उद्योगासाठी कर्ज घेताना डबल डिजिटमध्ये त्याचा व्याजदर नसावा असे सांगून कुलकर्णी म्हणाल्या की, लहानपणी आईकडून कपड्यावरील सुई दो-याने केलेले विणकाम या पारंपरिक कला क्षेत्रामध्ये दिलेल्या अपूर्व योगदानाबद्दल माझे नाव ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. तसेच या कलेतील संशोधनासाठी मला केंद्र सरकारच्या वतीने पाच लाख रुपयाची फेलोशिप सुद्धा मिळाली आहे. म्हणून विद्यार्थिनींनी जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाचा भरपूर आनंद घ्यावा. ईश्वराने आपल्याला दिलेले जीवन हे अमूल्य आहे ते दु:खी न घालवता आनंदात घालवावे. प्रत्येक कामामध्ये मी आनंद शोधत असल्यामुळे मला उद्योग, बॅडमिंटन, कविता लेखन, अभिवाचन, संत साहित्य या क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली. आपणही आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करावे.
अध्यक्षीय समारोपात प्रा. कांबळे म्हणाल्या की, युवतींनी आपले स्वप्न साकार करण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवली पाहिजे. अनेक संकटांचा सामना करून मिळालेले यश हे आपल्याला फार मोठा आनंद प्राप्त करून देते. जगामध्ये अशक्य असे काहीच नाही फक्त ते करण्याचा दृष्टिकोन आपल्या जवळ असणे गरजेचे आहे. आपण प्राप्त केलेला यशामुळे आपले आई वडील तर आनंदी होतातच परंतु तुमच्या यशामुळे इतर युवतींना सुद्धा प्रेरणा मिळू शकते. म्हणून प्रत्येक युवतीने आपल्याला प्राप्त झालेल्या संधीचा सदुपयोग करावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रमोद चव्हाण यांनी केले. तर आभार डॉ. केशव अलगुले यांनी मांडले.