27.6 C
Latur
Monday, April 22, 2024
Homeसंपादकीय विशेषयुवा खेळाडूंचा नवोन्मेष

युवा खेळाडूंचा नवोन्मेष

भारतीय क्रिकेट संघाच्या यंग ब्रिगेडने ३-१ च्या फरकाने कसोटी मालिकेत इंग्लंडला पराभूत करताना एक मोठा विजय नोंदवला आहे. या विजयाला अनेक पैलू आहेत. टी-२० सारख्या धडाकेबाज आणि कमी षटकांच्या सामन्यांमध्ये तडफदार कामगिरी करणा-या नवोदित क्रीडापटूंसाठी कसोटी क्रीडा प्रकार हा कठीण ठरणारा होता; परंतु यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान, शुभमन गिल, यष्टिरक्षक ध्रुव जुरेल यांसारख्या युवा खेळाडूंची या मालिकेतील कामगिरी भविष्यातील भारतीय संघासाठी आश्वासक ठरणारी आहे.

खेळ असो वा राजकारण, काळानुसार होणारा बदल हा थोडा कठीण असतो. मग तो चांगल्यासाठी का असेना. क्रिकेट आणि अन्य प्रकारच्या तुलनेत कसोटी क्रिकेटमध्ये बदल हा अवघड असतो. कारण या प्रकारात क्रिकेटपटूंना जम बसविणे वाटते तेवढे सोपे नसते. भारतीय कसोटीत ब-याच काळापासून अशा बदलाची वाट पाहिली जात होती. परंतु भारतीय यंग ब्रिगेडने ज्या रीतीने इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’ रणनीतीचा बँड वाजविला आणि तिसरी कसोटी जिंकून ३-१ अशी आघाडी मिळाली, ते पाहता भारतीय तरुण क्रिकेटपटू कसोटीची जबाबदारी सांभाळण्यास पूर्णपणे तयार असल्याचे लक्षात येते.

इंग्लंडच्या नव्या, आक्रमक, गतिमान शैलीला ‘बॅझबॉल’ म्हटले जाते. न्यूझिलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्यूलमकडे इंग्लंड संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविली. त्याचे टोपणनाव बझ असे आहे. तो जी रणनीती आखतो, त्या रणनीतीचे नाव बॅझबॉल आहे. या रणनीतीने इंग्लंडची कसोटी क्रिकेट खेळण्याची संस्कृती बदलून टाकली आहे. पण भारतीय तरुण खेळाडूंनी या रणनीतीला मागे टाकले. धावांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर तरुण खेळाडूंनी आपल्याच बळावर संघाला सर्वांत मोठा विजय मिळवून दिला. ४३४ धावांनी संघाला विजय मिळवून देणा-या शिल्पकारांत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले तरुण खेळाडू यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान, शुभमन गिल, यष्टिरक्षक धु्रव जुरेल यांचे मोठे योगदान राहिले. या मालिकेत सलामीचा फलंदाज जयस्वाल, तिस-या क्रमांकावर फलंदाजी करणारा शुभमन गिल,

मधल्या फळीत खेळणारा नवखा, उमदा खेळाडू सर्फराज खान आणि यष्टिरक्षक ध्रुव जुरेल यांनी छाप पाडली असून त्यांच्यावर आता विश्वास ठेवता येणार आहे. कसोटी क्रिकेटचे भवितव्य उज्ज्वल करणारे हे खेळाडू मोठ्या कष्टातून गवसले आहेत. ही मालिका सुरू होण्याअगोदर इंग्लंड संघाचे प्रशिक्षक ब्रॅडन मॅक्यूलम अणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्या ‘बॅझबॉल’ रणनीतीचा डंका जगभरात पिटला जात होता. मालिका सुरू होण्यापूर्वी विराट कोहली हा कौटुंबिक कारणामुळे सहभागी झाला नाही. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर देखील जायबंदी झाले. परिणामी भारत पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत झाला. त्यामुळे चेतेश्वर पुजारा अणि अजिंक्य राहाणे यासारख्या जुन्या खेळाडूंना संघात बोलवावे की नाही असा यक्षप्रश्न निवड समिती आणि संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला. मात्र त्यांनी यंग ब्रिगेडवर विश्वास टाकला आणि हा निर्णय योग्य ठरला. आता कसोटी संघाला तरुण क्रिकेटपटू मिळाले असून त्यांच्यावर पुढील काही वर्षे जबाबदारी निश्चिंतपणे सोपविता येणे शक्य आहे.

या तरुण खेळाडूंनी घरच्या मैदानावर चांगली कामगिरी केली असली तरी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या वातावरणात त्यांची पडताळणी होणे बाकी आहे. परंतु युवकांनी एकप्रकारे चाहत्यांच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.
भारताचा २२ वर्षीय सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल याची कामगिरी सर्वांना भारावून टाकणारी ठरली. सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीसारखी प्रतिभा त्याच्या खेळीत पाहावयास मिळाली. यशस्वीने आपला धडाका असाच सुरू ठेवला तर त्याचे नाव या दिग्गज खेळाडूंत सामील करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. सर्फराज खान आणि धु्रव जुरेल यांनी पहिल्या सामन्यात लोकांची मने जिंकली होती. सर्फराज हा गेल्या तीन हंगामात घरच्या मैदानावर धावांचा डोंगर उभा करत होता आणि कसोटी संघाचे दार ठोठावत होता. ध्रुवने तर अद्याप कसोटी संघात जाण्याचे स्वप्न देखील पाहिले नव्हते. कारण काही दिवसांपूर्वीपर्यंत एस. भरत हा पहिल्या क्रमांकाचा यष्टिरक्षक होता आणि त्यापूर्वी ईशान किशन हा या शर्यतीत होता. परंतु ध्रुव आता संघातील स्थान पक्के करेल, असे वाटत आहे.

सर्फराज याची धावा काढण्याची तडफ पाहून कर्णधार रोहित शर्माने त्याचे कौतुक केले आहे. तो पहिल्याच कसोटीत अर्धशतक ठोकण्यात यशस्वी ठरला. या तरुणांच्या चमकदार कामगिरीकडे मेहनत आणि इच्छाशक्तीचा विजय म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे देशातील लाखो तरुणांना कसोटी खेळण्याची प्रेरणा मिळेल. तसेच भारतीय संघ व्यवस्थापनाने, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने आता पुढचा विचार केला पाहिजे. भविष्यासाठी कसोटी खेळाडू मिळाले आहेत. मात्र त्यांचा संघ व्यवस्थापन कसा उपयोग करते, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड हे या सर्वांशी अगदी पहिल्यापासून जोडले गेलेले आहेत. त्यांना या खेळाडूंचे कौशल्य चांगलेच ठाऊक आहे. शेवटी या युवकांना अनुभवाची जोड मिळणे स्वाभाविकच आहे.

भारतीय यंग ब्रिगेडचे वैभव क्रिकेटसह अन्य क्रीडाप्रकारातही पाहायला मिळाले. एकीकडे यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल या युवा क्रिकेटपटूंनी इंग्लंडचे बॅझबॉल क्रिकेट खेळून भारताला पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवून दिली आहे. दुसरीकडे, अनमोल परब, अश्मिता चलिहा, गायत्री गोपीचंद आणि त्रिशा जॉली या युवा शटलर्सनी भारतीय महिला बॅडमिंटन संघाला प्रथमच बॅडमिंटन आशिया सांघिक स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्यास मदत केली. भारतीय कसोटी क्रिकेट असो की बॅडमिंटन, दोन्ही खेळांमध्ये तरुणांना पुढे येण्याची खूप प्रतीक्षा होती. या दोन यशांमुळे यंग ब्रिगेडने भविष्याची जबाबदारी उचलण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केल्याचे दिसते. क्रिकेटवेड्या देशात ब-याच काळापासून क्रिकेट चाहत्यांना कसोटी सामन्यातील यशासाठी विराट कोहली, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि काही प्रमाणात के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे पाहण्याची सवय झाली होती.

त्यामुळे या महान खेळाडूंशिवाय भारताला कसोटी क्रिकेटमध्ये भवितव्य नाही, असे वाटत होते. भारतीय संघ काही काळ पुजारा आणि रहाणेच्या साथीने पुढे गेला होता. पण बाकीचा संघ आधारस्तंभ राहिला आहे, पण इंग्लंडविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतून माघार घेतली आणि त्यानंतर राहुल आणि अय्यर जखमी झाले. यानंतर भारताने पहिला कसोटी सामना हारला तेव्हा हा संघ आता लढण्यास सक्षम नाही असे अनेकांना वाटले. पण भारतीय संघ व्यवस्थापनाने तरुणांवर विश्वास दाखवल्याबद्दल कौतुक करावे लागेल. या तरुणांपैकी यशस्वी जयस्वालने सलग दोन कसोटी सामन्यांमध्ये द्विशतके झळकावून क्रिकेट जगतात आपले आगमन जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे सर्फराज खानने ज्या प्रकारची धावांची भूक दाखवली त्यावरून तो ‘लंबी रेस का घोडा’ आहे हे स्पष्ट होते. ऋषभ पंतची कमतरता ध्रुव जुरेलने ब-याच अंशी भरून काढली आहे. हे पाहता संघाचे भविष्य उज्ज्वल दिसत आहे. आशियाई सांघिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये, १७ वर्षीय अनमोल आणि चालिहा यांनी आपल्या चमकदार कामगिरीने दाखवून दिले की उद्याचा दिवस त्यांचा आहे. त्यामुळे या दोन्ही खेळांमध्ये भारताचे भवितव्य भक्कम हातात असल्याची आशा आहे.

-नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR