37.6 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeराष्ट्रीययूपीएससीत पुण्याचा अर्चित डोंगरे राज्यात पहिला

यूपीएससीत पुण्याचा अर्चित डोंगरे राज्यात पहिला

शक्ती दुबे देशात पहिली, हर्षिता गोयल दुसरी तर अर्चित देशात तिसरा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या यूपीएससी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला असून शक्ती दुबे या महिला उमेदवाराने देशात पहिला क्रमांक पटकावला तर हर्षिता गोयल देशात दुसरी आली असून पुण्याच्या अर्चित डोंगरेने देशात तिसरा आणि महाराष्ट्रात पहिला आला आहे. यंदाही यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राने आपली पताका फडकावली असून पुणे, ठाण्यासह विविध जिल्ह्यातील उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. त्यामध्ये मुलींनीही दैदिप्यमान कामगिरी बजावली आहे.

यूपीएससी परीक्षा २०२४ चा निकाल आज जाहीर करण्यात आला असून यूपीएससी डॉट जीओव्ही डॉट ईन या वेबसाईटवर हा निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या परीक्षेत शक्ती दुबे या उमेदवाराने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून एकूण १००९ उत्तीर्ण उमेदवारांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये ३३५ सर्वसाधारण, १०९ ईडब्ल्यएस, ३१८ ओबीसी, १६० एससी, ८७ एसटी प्रवर्गातील उमेदवार आहेत. या उमेदवारांच्या १७ एप्रिल २०२५ पर्यंत मुलाखती घेण्यात आल्या होत्या. ७ जानेवारी २०२५ पासून मुलाखतीच्या राऊंडला सुरुवात झाली होती. २०२४ च्या परीक्षेत यूपीएससीने आयएएस, आयपीएससह एकूण ११३२ पदांसाठी भरती काढली होती.

देशात पहिली आलेल्या शक्ती दुबेने अलाहाबाद विद्यापीठातून बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी (विज्ञान पदवी) पूर्ण केली. तिने राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हा पर्यायी विषय निवडला अणि त्यात पात्रता मिळविली. २०१८ पासून तिचे प्रयत्न सुरू होते. सात वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर तिला यश मिळाले. देशात दुसरी आलेल्या हरियाणाच्या हर्षिता गोयलने बडोद्याच्या एमएस विद्यापीठातून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. तिने यूपीएससी मुख्य परीक्षेत राजकीय शास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय पर्यायी विषय म्हणून घेतले होते. हर्षित सीए आहे तर देशात तिसरा आलेला मराठमोळा अर्चित डोंगरे वेल्लोरमधील व्हीआयटी येथून इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बी.टेक) पदवी घेतली. त्याचा तत्वज्ञान हा परीक्षेसाठी पर्यायी विषय होता.

यूपीएससीत मराठी झेंडा
यूपीएससी परीक्षेत यंदाही मराठी झेंडा फडकला असून पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा आणि राज्यात पहिला आला. ठाण्यातील तेजस्वी देशपांडेने ९९ वी रँकिंग, ठाण्याच्या अंकिता पाटीलने ३०३ वा रँक मिळवला. जालन्यातील आकाश गोरेने यश मिळविले. यवतमाळ जिल्ह्यातील अदिबा अनम अश्फाक अहमदने १४२ वी रँक प्राप्त करीत महाराष्ट्राची पहिली महिला मुस्लिम आयएएस बनली आहे. नांदेड जिल्ह्यातून शिवराज गंगावळ, शुभांकर हिब्बारे, अतुल राजूरकर, आनंद सदावर्ते या चौघांनी तर लातूर जिल्ह्यातून रेणापूर तालुक्यातील पानगावची कन्या संपदा धर्मराज वांगेने ८३९ वा रँक आणि जळकोट तालुक्यातील चाटेवाडीच्या सुशील सूर्यकांत गिते याने ६२३ वी रँक मिळविली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR