36.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रयेत्या वर्षापासून राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू

येत्या वर्षापासून राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू

राष्ट्रीय धोरण, २०२५-२६ पासून पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी राज्यातील शाळांमध्ये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून टप्प्या-टप्प्याने लागू करण्यात येणार आहे. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी नवा अभ्यासक्रम असेल. पारंपरिक १०+२+३ ऐवजी नवीन ५+३+३+४ आकृतीबंध स्वीकारण्यात आला असून शिक्षण आता पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा ४ टप्प्यांत विभागले गेले आहे. शालेय शिक्षण विभागाने या बाबतचा जीआर जारी केला आहे.

आता प्राथमिक आणि माध्यमिक असे विभाग राहणार नसून त्याऐवजी पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक अशा ४ स्तरांमध्ये इयत्तांची विभागणी होईल. ३ ते ८ वर्षांपर्यंत म्हणजेच इयत्ता दुसरीपर्यंत पायाभूत स्तर असेल. त्यानंतर तिसरी ते पाचवी या इयत्तांचा समावेश पूर्वतयारी स्तरात असेल. सहावी, सातवी आणि आठवी या इयत्तांना पूर्व माध्यमिक स्तरात गणण्यात येईल आणि नववी, दहावी, अकरावी आणि बारावीपर्यंत माध्यमिक स्तर गणला जाणार आहे.

एनईपीची अंमलबजावणी पदवी अभ्यासक्रमासाठी २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून सुरू झाली होती. त्यानंतरचा टप्पा असलेल्या शालेय शिक्षणासाठीची तयारीही राज्य सरकारने सुरू केली होती. एनसीईआरटीच्या धर्तीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्य अभ्यासक्रम आराखडाही तयार केला. या आराखड्यानुसार शैक्षणिक क्षमता निश्चिती करण्यात आली असून त्या दृष्टीने आता पाठ्यपुस्तके तयार झाली आहेत.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून पहिलीच्या अभ्यासक्रमात बदल होणार आहे. एससीईआरटीने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याच्या आधाराने तयार केलेला राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२४ लागू होईल. त्यामुळे पहिलीसाठी नवीन पाठ्यपुस्तके येतील. २०२६-२७ म्हणजेच पुढल्या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी या इयत्तांच्या अभ्यासक्रमात बदल होईल. त्यानंतर २०२७-२८ मध्ये इयत्ता पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या ४ वर्षांचा अभ्यासक्रम तिस-या टप्प्यात बदलेल. अंतिम टप्प्यात म्हणजेच २०२८-२९ मध्ये आठवी, दहावी आणि बारावी या इयत्तांची पुस्तके बदलतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR