33.4 C
Latur
Tuesday, May 6, 2025
Homeलातूरयोग्य उपचार घेतल्यास दमा नियंत्रणात राहतो

योग्य उपचार घेतल्यास दमा नियंत्रणात राहतो

लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही वर्षांत देशात अस्थमा, या आजाराला दमा, असे देखील संबोधिले जाते. त्याचे प्रमाण वाढले आहे. हा आजार फुफ्फुसाशी निगडित असून, यामध्ये श्वसनलिका आकुंचन पावतात. त्यावर सूज येते त्यामुळे रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. हा दीर्घकालीन आजार असून चांगल्या औषधोपचारामुळे त्यावर  नियंत्रण मिळविणे सोपे असते. मात्र, यासाठी रुग्णांनीसुद्धा काही पथ्य पाळणे गरजेचे आहे. अनेक वेळा दम्याचे निदान न झाल्याने रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नाही. त्यामुळे या रुग्णांमध्ये मोठी गुंतागुंत निर्माण होऊन जीवावर सुद्धा बेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, असे श्वसनविकार व छातीविकार तज्ज्ञ डॉ. रमेश भराटे यांनी सांगीतले.
‘जागतिक अस्थमा दिन’ दरवर्षी मे महिन्यात पाळला जातो. आपल्याकडे दमा या आजाराविषयी अनेक गैरसमज आहे. आपल्याकडे आजारात दम लागला तरच दमा असा आजार आहे, असे मानले जाते. मात्र ते पूर्णपणे चुकीचे असून अनेकवेळा सतत येणार खोकला सुद्धा दम्याचे लक्षण असते. दम्याचे अनेक रुग्ण अ‍ॅलर्जीच्या नावाखाली दुर्लक्षित होतात. तसेच अनेक वेळा ते अँटिबायोटिक्स घेऊन त्या आजारावर उपचार घेतात. मात्र, या रुग्णांना त्याचा फारसा फायदा होत नाही. त्यामुळे या  आजाराचे व्यवस्थित निदान करणे गरजेचे आहे. पी.एफ.टी. आणि रक्ताच्या चाचण्या करून दमा आजाराचे निदान करणे शक्य आहे.
 अनेकवेळा काही डॉक्टर रुग्ण नाराज होईल म्हणून किंवा उपचार घेणार नाही यामुळे दमा न सांगता अ‍ॅलर्जी किंवा ब्रॉन्कायटिस हा आजार सांगतात. मात्र, यामुळे रुग्ण मूळ आजारांपासून अनभिज्ञ राहतात. भारतात ४ ते २० टक्के प्रमाणात लहान मुलांमध्ये हा आजार आढळून येतो . तर २ टक्के प्रौढांमध्ये हा आजार आढळून येतो. लहानपणी या आजाराचे निदान होऊन उपचार घेतल्यास रुग्ण वयाच्या १८ वर्षांपर्यंत पूर्णपणे बरा होतो. तर प्रौढांमध्ये हा आजार दीर्घकालीन असतो. त्यासाठी त्यांना आयुष्यभर औषधोपचार घ्यावे लागतात, असेही डॉ. भराटे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR