18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूररजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांमध्ये असंसर्गजन्य आजारांवर संशोधन

रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांमध्ये असंसर्गजन्य आजारांवर संशोधन

लातूर : प्रतिनिधी
युनायटेड नेशन्सने शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी २०२३ च्या कार्यसूचीमध्ये असंसर्गजन्य आजार ही एक प्रमुख आरोग्य समस्या म्हणून नोंद घेतली आहे. त्यांच्या पाहणीनुसार एकूण मृत्यूपैकी ७१ टक्के मृत्युसाठी असंसर्गजन्य आजार मुख्य कारण आहे. त्यापैकी कार्डीओ व्हास्कुलर आजारांमुळे दरवर्षी जवळजवळ १८ दशलक्ष मृत्यू होतात. त्यामध्ये -हदयविकार आणि पक्षाघात हे विकसित देशातील मृत्यूचे प्रमुख कारण आहे. जवळजवळ ३५ टक्के स्त्रिया दरवर्षी या आजारांमुळे प्रभावित होतात, त्यामुळे यावर विशेष शोधप्रबंध अभ्यास करण्यासाठी विशेष प्रकल्प पोस्ट मेनोपॉजल वुमन्स सोसायटीमार्फत लातूर जिल्ह्यामध्ये राबविण्यात आला. हा प्रकल्प सार्वजनिक आरोग्य विभाग, लातूर व विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्यातून पूर्ण करण्यात आला.
लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये, पोस्ट मेनोपॉजल वुमन्स सोसायटी व विलासराव देशमुख फाउंडेशन आणि सार्वजनिक आरोग्य विभाग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने रजोनिवृतीनंतर स्त्रियांमध्ये उद्भवणा-या असंसर्गजन्य आजारांबद्दल संशोधनासाठी अभ्यास करण्यात आला. हा आरोग्यदायी उपक्रम टवेन्टिवन अ‍ॅम्ग्री ली. च्या संचालीका अदिती अमित देशमुख यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला. यामध्ये ग्रामीण भागातील रजोनिवृत्ती वयाच्या जवळील असणा-या एकूण ४०० महिलांचा अभ्यासामध्ये  समावेश करण्यात आला. सुरुवातीला संबंधित भागातील आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. सार्वजनिक आरोग्य विभागातील त्रिस्तरीय रचनेनुसार आरोग्य उपकेंद्र हरंगुळ बु., प्राथमिक आरोग्य केंद्र गंगापूर आणि ग्रामीण रुग्णालय बाभळगाव या संस्थांच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असणा-या तीन गावातील ४० वर्षांवरील महिलांची निवड करण्यात आली. रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये विविध हार्मोनल चढउतार होतात. त्यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिकरित्या महिलांमध्ये रजोनिवृत्ती पर्यंत असणारे विविध आजारांचे कवच हे, रजोनिवृत्तीनंतर नसते. त्यामुळे महिलांना विशेषत: भावनिक चढउतार आणि असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. म्हणून  सदर महिलांची आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय संबंधितस्तरावर आरोग्याच्या विविध तपासण्या करण्यात आल्या.
ज्या तपासण्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमध्ये उपलब्ध नव्हत्या, त्या बाहेरुन करण्यात आल्या. त्यानंतर तपासण्यांच्या निष्कर्षाचा अभ्यास करण्यात आला. अभ्यासामध्ये विशेषत: डिस्लिपिडेमिया, ऑस्टियोपेनिया, मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्चरक्तदाब यांचे प्रमाण अनुक्रमे ५८ टक्के, ५० टक्के, २५ टक्के आणि २० टक्के असे आढळले. जे की पाश्चात्य देशातील प्रमाणापेक्षा खूप कमी आहे. याकरिता विविध कौटुंबिक, सामाजिक, वैचारिक, आर्थिक घटक हे कारणीभूत आहेत.
या अभ्यासामध्ये असे आढळून आले की सार्वजनिक आरोग्य यंत्रणेतील आरोग्य कर्मचा-यांच्या साहाय्याने असंसर्गजन्य रोगांचे लवकर निदान होणे, वेळेवर संदर्भ सेवा देणे आणि योग्य वेळी वेळेवर उपचार करणे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधार स्कीनिंग साधनाचा वापर करुन जोखीम असलेल्या महिलांच्या तपासणी करिता ही पद्धत खूप फायदेशीर आहे. सदरील प्रकल्प सार्वजनिक आरोग्य विभाग, लातूर व विलासराव देशमुख फाउंडेशन यांच्या विशेष सहकार्यातून पूर्णत्वास नेणे शक्य झाले,
यामुळे पोस्टमेनोपॉझल वुमन सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. दुरु शहा यांनी सर्वांचे विशेष आभार मानले आहेत. या प्रकल्पाच्या यशस्वीते करीता विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने तत्कालीन एनसीडी कॉर्डिनेटर यांच्यासह संबंधित आरोग्य संस्था स्तरावरील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR