32.6 C
Latur
Monday, February 26, 2024
Homeसंपादकीय विशेषरन मशिन...सरफराज!

रन मशिन…सरफराज!

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघामध्ये सरफराज खानची निवड झाल्यामुळे त्याच्या चाहत्यांसह राज्यभरातून आनंद व्यक्त होत आहे. क्रिकेटच्या विश्वातील दिग्गज फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसण्याचे कसब आपल्यात असल्याचे सरफराजने आजवर मैदानावर केलेल्या अनेक विक्रमांतून दाखवून दिले होते. वयाच्या बाराव्या वर्षी सचिन तेंडुलकरचा हॅरिस शिल्डचा विक्रम मोडून त्याने ४२१ चेंडूंत ४३९ धावा केल्या तेव्हा देशातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेटरसिकांनी अक्षरश: तोंडात बोटे घातली ! आता इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेताना सरफराजची तळपती बॅट कोणता नवा विक्रम करते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
क्रिकेट हा भारतातील सर्वाधिक लोकप्रिय क्रीडाप्रकार बनला त्यालाही आता बराच काळ उलटला आहे. दोन दशकांपूर्वी क्रिकेटबाबतचे प्रेम  गल्लीबोळांमध्ये, गावातील मैदानावर क्रिकेट खेळणा-या मुलांच्या माध्यमातून आणि टीव्हीच्या पडद्यावर क्रिकेटचे सामने पाहण्यातून दिसत होते. पण कसोटी, एकदिवसीय सामने, रणजी, आंतरराष्ट्रीय सामने यांमध्ये झळकण्याचे स्वप्न उराशी बाळगणा-यांची संख्या आजच्याइतकी नव्हती. परंतु आयपीएलचा उदय झाला आणि देशाच्या कानाकोप-यातील अनेक क्रिकेटपटू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकू लागले. या प्रसिद्धीबरोबरच प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसाही खेळाडूंना मिळू लागला. अर्थातच यामुळे स्पर्धा प्रचंड वाढीस लागली.
कसलेल्या आणि खरोखरीच कसब असणा-या खेळाडूंनाच संधी दिली जात असल्याने क्रिकेटमधील गुणवत्ता वाढली. सरफराज खान हा अशी गुणवत्ता असणा-या खेळाडूंमधील तडाखेबंद आणि धडाकेबाज फलंदाज. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईची रन मशिन म्हणून ओळखल्या जाणा-या सरफराजला अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. सरफराजच्या आजवरच्या संघर्षमय कारकीर्दीला एक नवा आयाम या निवडीमुळे मिळणार आहे.  वास्तविक, विराट कोहलीने या मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सरफराज आणि रजत पाटीदार यांची नावे त्याला पर्याय म्हणून सर्वांत आधी समोर आली, पण निवडकर्त्यांनी पाटीदारची निवड केली. यानंतर भारत अ संघाकडून इंग्लंड लायन्सविरुद्ध सरफराजने शतकी खेळी करत १६१ धावा केल्या आणि निवड समितीसमोर पुन्हा एकदा आपला दावा मांडला. आता के. एल. राहुलच्या दुखापतीमुळे त्याला संघात स्थान मिळाले आहे.
सरफराज गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई संघासाठी अप्रतिम कामगिरी करत आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या नावावर तिहेरी शतक नोंदवलेले आहे. ३०० धावांची वैयक्तिक धावसंख्या मैदानावर उभी करणे ही बाब अत्यंत कठीण आहे. पण आपल्या तळपत्या बॅटने सरफराज अक्षरश: गोलंदाजांवर तुटून पडतो आणि मोठी धावसंख्या उभी करतो. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ४५ सामन्यांत ६६ डावांमध्ये ३९१२ धावा केल्या आहेत. यामध्ये १४ शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. या काळात त्याची सरासरी ६९.८५ आहे. सरफराज खानने फलंदाजी करताना सातत्यपूर्ण दमदार कामगिरी सुरूच ठेवली आहे, हे विशेषत्वाने लक्षात घ्यायला हवे. याशिवाय लिस्ट ए मध्ये ३७ सामन्यांत त्याच्या नावावर ६२९ धावा आहेत.
एकेकाळी आपल्या तंदुरुस्तीमुळे टीकेला सामोरे जाणा-या सरफराज खानने बॅटने आपली दमदार कामगिरी सुरू ठेवताना कधीही हार मानली नाही. २०२२-२३ च्या हंगामात सरफराजने सहा सामन्यांमध्ये ९२.६६ च्या सरासरीने ५५६ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतकांचाही समावेश आहे. २०२१-२२ हंगामातील सहा सामन्यांमध्ये त्याने १२२.७५ च्या सरासरीने ९८२ धावा केल्या असून त्यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. २०१९-२० हंगामात मुंबईसाठी सहा सामन्यांत १५४.६६ च्या प्रभावी सरासरीने  सरफराजने ९२८ धावा केल्या. यामध्येही तीन शतकांचा समावेश होता. तीन देशांतर्गत हंगामात त्याच्या नावावर २४६६ धावा नोंदवल्या गेल्या असून हा एक मोठा विक्रम आहे. त्याच्याशिवाय गेल्या तीन मोसमात अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज नाही.
आज कसोटी संघात स्थान मिळाल्यामुळे सरफराजची चर्चा होत असली तरी तो ख-या अर्थाने प्रसिद्धीस पावला २००९ मध्ये. यावर्षी  सचिन तेंडुलकरचा हॅरिस शिल्डचा विक्रम मोडून त्याने ४२१ चेंडूत ४३९ धावा करून देशातीलच नव्हे तर जगभरातील क्रिकेटरसिकांना अचंबित केले होते. त्यावेळी त्याचे वय होते केवळ १२ वर्षे आणि हा त्याचा पहिलावहिला हॅरिस शील्ड गेम होता. या खेळीत ५६ चौकार आणि १२ षटकारांचा समावेश होता. यानंतर तो लवकरच मुंबई अंडर-१९ संघासाठी खेळू लागला आणि त्याच्या कामगिरीमुळे त्याची भारतीय अंडर-१९ संघात निवड झाली. २०१३ मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-१९ विरुद्ध ६६ चेंडूत १०१ धावांची सामना जिंकणारी खेळी खेळली, ज्यामध्ये १७ चौकार आणि एक षटकार समाविष्ट होता. भारताच्या अंडर-१९ संघाचे तत्कालीन मुख्य प्रशिक्षक भरत अरुण यांनी त्यावेळी टिप्पणी केली होती की ‘‘तो एक धाडसी खेळाडू आहे, परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेतो.
त्याने विकेटभोवती शॉट्स मारले आहेत आणि सरळ खेळताना तो आणखी चांगला दिसतो. तो पायाचा चांगला वापर करतो. चिक स्ट्रोक मारण्यात तो माहीर आहे.  सरफराज भारताकडून दोन अंडर-१९ विश्वचषक (२०१४ आणि २०१६) खेळला. २०१४ अंडर-१९ विश्वचषक राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये भारत ५ व्या स्थानावर होता. या स्पर्धेतील सहा सामन्यांत ७०.३३ च्या सरासरीने त्याने २११ धावा केल्या होत्या. दोन डावांत अर्धशतके होती आणि त्याचा स्ट्राईक रेट १०५.५ होता. बांगलादेशमध्ये २०१६ च्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारत उपविजेता ठरला. सरफराज या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता. त्याने सहा डावांत ५० पेक्षा जास्त स्कोअरसह ७१ च्या सरासरीने ३५५ धावा केल्या होत्या. अंडर-१९ स्तरावर, विश्वचषकात सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम (दोन विश्वचषकांमध्ये ७ अर्धशतके) त्याच्या नावावर आहे.
या कामगिरीनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्याला २०१५ च्या आयपीएल हंगामासाठी पन्नास लाखांची बोली लावून विकत घेतले. वयाच्या १७ व्या वर्षी आयपीएल सामन्यात दिसणारा तो सर्वांत तरुण खेळाडू ठरला.  २०१६ च्या आयपीएलमधला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामना सरफराजसह सर्वांच्याच स्मरणात राहणारा ठरला. हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारसमोर आरसीबीच्या भल्याभल्या फलंदाजांचा निभाव लागत नव्हता. त्याकाळी भुवी जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता. त्याच्या स्विंगसमोर दिग्गजांची दाणादाण उडायची. चौकार-षटकार सोडा, विकेट वाचवणं अवघड जायचं. पण त्या सामन्यात एका नव्या दमाच्या सरफराजने भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला. तो जेव्हा पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा त्याचे संघ सहकारी विराट कोहली, ख्रिस गेल त्याचं कौतुक करायला रांगेत उभे होते. त्याच्या खेळीला दाद म्हणून सगळेच उभे राहिले होते. उंचीने थोडा कमी असलेल्या सरफराज खानच्या खेळीची त्यावेळी खूप चर्चा झाली.
भारताच्या डोमेस्टिक क्रिकेटचा डॉन ब्रॅडमन समजल्या जाणा-या सरफराज खानने २०१६ च्या आयपीएलमध्ये हैदराबादविरुद्ध १० चेंडूंमध्ये नाबाद ३५ धावांची वादळी खेळी साकारली होती. सर्फराजने २०१४ मध्ये बंगालविरुद्ध खेळताना मुंबईकडून रणजी कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्याने २०१५-२०१६ हंगामापासून उत्तर प्रदेशकडून खेळण्यास सुरुवात केली. सप्टेंबर २०१९ पर्यंत त्याने ११ प्रथम-श्रेणी सामने खेळले होते आणि १५५ च्या सर्वोच्च स्कोअरसह ५३५ धावा केल्या होत्या. त्याने १२ लिस्ट ए सामने देखील खेळले आणि ९६.२५ च्या स्ट्राईक रेटने २५७ धावा केल्या. ३ जानेवारी २०२० मध्ये, उत्तर प्रदेशविरुद्ध २०१९-२० रणजी ट्रॉफी सामन्यात, सरफराजने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिले त्रिशतक झळकावले.  सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या २०२२ च्या हंगामात सरफराजने अधूनमधून यष्टिरक्षक म्हणून नवीन अवतार धारण करण्यास सुरुवात केली. त्याच्या ज्युनियर खेळाच्या दिवसात यष्टीरक्षण काही नवे नसले तरी वरिष्ठ क्रिकेटमध्ये त्याची ही पहिलीच वेळ होती. ताज्या निवडीनंतर पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांमध्ये सरफराजची बॅट तळपणार आहे. इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत सरफराजकडून नवा विक्रम प्रस्थापित व्हावा, हीच त्याच्या चाहत्यांची इच्छा आहे.
-नितीन कुलकर्णी, क्रीडा अभ्यासक

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR