शिरुर अनंतपाळ : शकिल देशमुख
सोयाबीन फुटून रानांवर पडून उगल्याने रबी हंगामातील पिकांत सोयाबीन लंबाचा ‘बोलबाला’ दिसून येत आहे. त्यामुळे रबी हंगामातील आंतरमशागतीच्या आगाऊ खर्चामुळे शेतक-यांंवर दुहेरी संकट आले असून शेतमजुरांची वाणवा व खुरपणी ला लागणारा मोठा खर्च पाहता उजेड येथील शेतक-याने चक्क सात एकर हरभ-यावर नांगर फिरवून हरभरा मोडला आहे.
यंदा अत्यल्प पावसाने सोयाबीन काढणी वेळे अगोदर आली खरी मात्र काढणीला मजुर मिळाले नसल्याने सोयाबीनच्या शेंगा फुटून शेतक-यांचे नुकसान झाले. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात घट झाली. त्यात रबीत पाणी दिलेल्या शेतात सोयाबीनचे लंबा मोठ्या प्रमाणात उगवल्याने आता रबी पिके दिसेनाशी झाली आहेत. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर या सोयाबीन लंबाच्या रुपाने आगाऊचा आर्थिक फटका बसत असल्याने रबी पिकांतील आंतरमशागतीने शेतक-यांचे कंबरडे मोडले आहे.
दरम्यान तालुक्यात नगदीचे पिक म्हणून मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेण्याकडे शेतक-यांचा कल असतो. यंदा सुमारे तेवीस हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांवर सोयाबीन घेण्यात आले. पावसाअभावी अगोदरच काढणीला आलेले सोयाबीन फुटून मोठे नुकसान झाले. त्यातून सावरत शेतक-यानी रबीची पेरणी केली व झालेले नुकसान रबीत भरून निघेल अशी अपेक्षा केली मात्र या सोयाबीनच्या लंबरुपी आर्थिक संकटाने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. पावसाअभावी खरीप हातचे गेले आता हरभरा व रबी ज्वारीमध्ये सोयाबीन मोठ्या प्रमाणात उगवल्यिाने रबी हंगामही धोक्यात आला असून यात ही वाट काढत पिके वाचविण्यासाठी शेतकरी जड अंतकरणाने खुरपणीच्या कामाला लागला आहे.