अमरावती : प्रतिनिधी
सध्या महायुतीतून अनेक नेते, पदाधिकारी हे महाविकासआघाडीत प्रवेश करत आहेत. तर दुसरीकडे महाविकासआघाडीतही हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच अमरावतीतील अपक्ष आमदार रवी राणा यांना मोठा धक्का बसला आहे. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या मुख्य प्रवक्त्याने संघटनेचा राजीनामा दिला आहे. ते रवी राणा यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय असल्याचे मानले जाते.
आमदार रवी राणा हे युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आहेत. रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते जितू दुधाने यांनी राजीनामा दिला आहे. गेल्या १७ वर्षांपासून जितू दुधाने हे आमदार रवी राणा यांच्यासोबत काम करत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर दुधाने यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
युवा स्वाभिमान संघटनेत माझी घुसमट होत आहे. त्यामुळे मला जबाबदारीतून मुक्त करा, असे जितू दुधाने यांनी म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. जितू दुधाने यांनी राजीनामा देण्यामागील नेमकं कारण काय याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राजकीय वर्तुळात खळबळ
जितू दुधाने हे गेल्या १७ वर्षांपासून युवा स्वाभिमान संघटनेसोबत काम करत आहेत. युवा स्वाभिमान पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून त्यांना ओळखले जाते. रवी राणा यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख होती. मात्र ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर जितू दुधाने यांनी राजीनामा दिल्याने रवी राणा यांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे सध्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.