मॉस्को : वृत्तसंस्था
युक्रेनशी सुरू असलेला संघर्ष मिटविण्यासाठी आपण भारत, चीन आणि ब्राझील या देशांशी सातत्याने संपर्कात असल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी हे तिन्ही देश प्रामाणिकपणे प्रयत्न करत असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘तास’ या वृत्तसंस्थेने याबाबत वृत्त दिले आहे.
इस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या अधिवेशनात पुतिन यांनी केलेले हे वक्तव्य म्हणजे फेब्रुवारी २०२२ पासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघण्याचे संकेत मानले जात आहेत. या मुद्द्यावर वाटाघाटींची युक्रेनची तयारी असेल तर मी पण त्या दिशेने पाऊल टाकू शकेन, असे पुतिन यांनी म्हटल्याचे अमेरिकी वृत्तसंस्था ‘पॉलिटिको’ने म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २३ ऑगस्ट रोजी केलेल्या युक्रेन दौ-यात राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर दोन आठवड्यांच्या आतच पुतिन यांनी भारताचे नाव घेऊन वाटाघाटीबाबत हे वक्तव्य केले आहे. ‘मित्र आणि सहका-यांचा आम्ही आदर करतो. या वादासंबंधी सर्व मुद्द्यांवर तोडगा निघावा म्हणून प्रामुख्याने चीन, ब्राझील आणि भारत यांच्या असलेल्या प्रामाणिक इच्छेबाबत मला विश्वास आहे’, असे पुतिन यांनी म्हटल्याचे ‘तास’ वृत्तसंस्थेने नमूद केले आहे.
रशिया म्हणतो, भारतच खुला करू शकतो मार्ग
रशियन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी युक्रेनशी चर्चेचा मार्ग खुला करण्यात भारत मदत करू शकतो, असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात असलेले विश्वासाचे आणि मैत्रीचे संबंध पाहता या वादावर तोडग्यासाठी तेच पहिले पाऊल उचलू शकतील, असेही त्यांनी नमूद केले.