वॉशिंग्टन : वृत्तसंस्था
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या २ वर्षांपेक्षा जास्त काळापासून संघर्ष सुरु आहे. या संघर्षात रशिया सातत्याने युक्रेनवर हल्ले करत आहे. या युद्धात युक्रेनची अनेक शहरे उद्ध्वस्त होत आहेत. एवढेच नाही तर या युद्धाचे परिणाम जगभरात देखील पाहायला मिळतात. मात्र, आता युक्रेन-रशियातील संघर्ष तात्पुरता थांबण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत आहे. यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मध्यस्थी करत असून त्यांची मध्यस्थी सफल होण्याची शक्यता आहे.
युक्रेनने देखील युद्धबंदीबाबत तयारी दर्शवली आहे. तसेच या संदर्भात सौदी अरेबियामध्ये अमेरिका आणि युक्रेनियन अधिका-यांमध्ये काही दिवसांपूर्वी उच्चस्तरीय चर्चाही झाली. आता व्हाईट हाऊस आणि कीव यांच्या संयुक्त निवेदनानुसार युद्धबंदी प्रस्तावात तात्पुरती युद्धबंदीची तरतूद आहे. युक्रेनने याबाबत आपली वचनबद्धता दर्शविलेली आहे. त्यामुळे आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भूमिका काय असणार, याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे.
यातच आज (१८ मार्च) अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्यात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमिर पुतिन यांनी फोनवरून संवाद साधत युक्रेन-रशियातील युद्धविरामाबाबतीत चर्चा केली असल्याची माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. याबाबत व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ यांनी माहिती दिली असून डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमिर पुतिन यांच्यात संवाद सुरु आहे. तसेच हा संवाद सकारात्मक होत आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.