शिर्डी : प्रतिनिधी
बहुचर्चित ‘छावा’ सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल आणि रश्मिका मंदाना शिर्डीला साईमंदिरात पोहोचले होते. साईंच्या मध्यान्ह आरतीनंतर दोघांनी साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. ‘छावा’ चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यावेळी आपल्या टीमसह साईदर्शनासाठी आले होते. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देशभर विविध राज्यांत फिरत असलेली ही टीम रिलीजपूर्वी साई दरबारात दाखल झाली.
अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘छावा’ सिनेमाची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला रिलीज होत आहे. विकी कौशलने या सिनेमात मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तर रश्मिका मंदाना सिनेमात महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘छावा’च्या संपूर्ण टीमने कंबर कसल्याचे दिसून येत असून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विकी कौशल आणि रश्मिका मंदाना प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत आणि देवदर्शन करताना दिसून येत आहेत.
यावेळी बोलताना विकी कौशल याने प्रथम शिर्डीला आल्याचे सांगत जीवनात कोणतीही सुरुवात करताना देवाचे आशीर्वाद महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तर रश्मिकाने साई दर्शनासाठी पहिल्यांदाच शिर्डीत आल्याचे सांगितले. ‘छावा’ चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता खूपच ताणली असून याच्या रिलीजला केवळ दोन दिवस बाकी आहेत.