22.3 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeलातूरराऊत परिवारातर्फे ५१ विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप

राऊत परिवारातर्फे ५१ विद्यार्थिनींना सायकलीचे वाटप

लातूर : प्रतिनिधी
घरापासून कोसो दूर असलेली शाळा वेळेत गाठता यावी, हा प्रवास सुकर व्हावा यासाठी कष्टकरी परिवारांच्या ५१ विद्यार्थिनींना येथील राज प्रतिष्ठान तसेच  सामाजिक कार्यकर्ते डॉ. हर्षवर्धन राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. शुभांगी राऊत यांच्या वतीने दि. १९ फेबु्रवारी रोजी शिवजयंती दिनी मोफत सायकली देण्यात आल्या. राऊत परिवाराची ही बांधिलकी मानवता तेजोमय करणारी असून हा आधार विद्यार्थिनींच्या शैक्षणिक जडण घडणीस हातभार लावेल, असा विश्वास पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी व्यक्त केला.
चंद्रनगरमधील अंबामाता मंदिराशेजारी असलेल्या गुजराती स्कूलच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. सीआरपीएफचे डेप्यूटी कमाडंट सुदीप वाघचौरे, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सुशीलादेवी राऊत, डॉ. राजेश एनाडले, डॉ. अशोक पोतदार, डॉ. सुबोध सोमाणी, संजय बोरा, डॉ. मशायक, अ‍ॅड. उदय गवारे, डॉ. हर्षवर्धन राऊत, डॉ. शुभांगी राऊत, डॉ. श्वेता काटकर, रुपाली वाघचौरे, आदिमाया गवारे आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना सोमय मुंडे यांनी छत्रपती शिवराय हे निश्चयाचा महामेरु, बहुत जनासी आधारु, अखंड स्थितीचा निर्धारु होते. प्रजेचे दैन्य दूर करण्यासाठी त्यांनी श्रीमंती वापरली तथापि त्या धनाचा उपयोग स्वतासाठी कधीही केला नाही या अर्थाने ते योगीच ठरले. शिवरायांच्या हे गुण आपण अंगिकारावेत असे आवाहन केले.
प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी स्वप्न, परीश्रम अन आत्मविश्वास  हिच यशाची त्रिसुत्री असून या मार्गाने वाटचाल केल्यास जगातली कोणतीही शक्ती तुमच्या यशाचा मार्ग रोखू शकत नाही, असे सांगितले. अनंत अडचणी असतानाही  याच गुणांनी छत्रपती शिवराय व मावळ्यांनी  स्वराज्य साकारले तसेच संकटेही परतवली. तुम्हीही मोठी स्वप्न पहा, परीश्रम करा अन खूप  खूप मोठे व्हा असे सांगत त्यांनी प्रतिष्ठानच्या कार्य अन उपक्रमाचे कौतूक केले. सुदीप वाघचौरे यांनी राज प्रतिष्ठानचे कार्य कौतूकास्पद अन प्रेरणादायी असल्याचे सांगितले. प्रातिनिधीक रुपात लाभार्थी विद्यार्थीनींनी या भेटीबद्दल राऊत परिवारांप्रति कृतज्ञता व्यक्त करीत ही भेट सदासर्वदा आमच्या स्मरणात राहील, अशी भावना व्यक्त केली. प्रास्ताविक दत्तात्रय पाटील यांनी केले. सुत्रसंचलन निवेदिका क्षीप्रा मानकर यांनी केले. आभार डॉ. हर्षवर्धन राऊत यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR