मुंबई : प्रतिनिधी
ठाकरे आणि पवार ब्रँड संपविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. निश्चितच सुरू आहेत. पण ते संपणार नाहीत, असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. राजकारण सोडा, पण महाराष्ट्र आज खूप वाईट अवस्थेमध्ये आहे. एवढे निश्चित आहे, अशी चिंता राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर आपली भूमिका मांडली. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नावे प्रकर्षाने येतात. ठाकरे आणि पवार. सद्यस्थितीत ठाकरे-पवार ब्रँड संपविण्याचा प्रयत्न चाललाय का, असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले. ठाकरे-पवार ब्रँड संपविण्याचा प्रयत्न चालला आहे, यात काही वाद नाही. पण तो संपणार नाही. मी हे लिहून द्यायला तयार आहे, तो संपणार नाही, असे राज ठाकरे यांनी ठासून सांगितले.