32.6 C
Latur
Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपतींचा पुतळा ताशी २०० किलोमीटर वा-याचा वेग झेलणार

छत्रपतींचा पुतळा ताशी २०० किलोमीटर वा-याचा वेग झेलणार

ऑस्ट्रेलियामध्ये झाली चाचणी

सावंतवाडी : प्रतिनिधी
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर बसविण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा वा-याच्या वेगाने पडला होता. त्यामुळे आता मालवण येथील समुद्रकिना-यावर वा-याचा असणारा प्रचंड वेग लक्षात घेऊन नवीन पुतळ्याला वादळी वा-याची झळ बसू नये म्हणून ऑस्ट्रेलियातील विंटेज कंपनीकडून ताशी दोनशे किलोमीटर वेगाने येणा-या वा-यावर पुतळ्याची चाचणी करून घेण्यात आली. त्यानंतर विंटेज कंपनीचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच हा पुतळा बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती बांधकामचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी यांनी दिली.

नवीन पुतळ्याचे काम प्रसिद्ध चित्रकार राम सुतार यांच्या कंपनीला देण्यात आले असून, त्यांनी ही विशेष खबरदारी घेतली आहे. पुतळा बसविण्याचे काम सुरू करण्यापूर्वी सुतार यांनी येथील भौगोलिक परिस्थिती जाणून घेतली. मालवण किनारपट्टीवर प्रचंड वा-याचा वेग असल्याने त्यांनी प्रथम छत्रपतींचा तीन ते चार फुटी पुतळा तयार करून घेत तो ऑस्ट्रेलियाला पाठविला होता.

तेथे असलेल्या विंटेज कंपनीकडून हा पुतळा वा-याच्या वेगाला कशाप्रकारे प्रतिसाद देईल याची चाचपणी करण्यात आली. त्यानंतरच हा पुतळा बसविण्याचे काम सुतार याच्या कंपनीकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. हे सर्व करत असताना पुतळ्याच्या प्रत्येक भागाचे परीक्षण, तसेच तपासणी आयआयटी मुंबईकडून करून घेण्यात आली आहे.

महाराजांच्या हातात २३०० किलो वजनाची तलवार
राजकोट किल्ल्यावर बसविण्यात येत असलेला छत्रपतींचा पुतळा हा ८३ फुटी असून त्याचे वजन ४० टन आहे. त्यांचा चबुतरा दहा फुटी आहे. हा पुतळा ब्राँझमध्ये तयार करण्यात आला आहे. यात तांबे ८८ टक्के, तर लोखंड आठ टक्के आहे. छत्रपतींच्या हातातील तलवार २३०० किलोची आहे.

सावंतवाडी बांधकाम विभागाची देखरेख
छत्रपतींचा पुतळा बसविण्याचे काम जरी मालवणमध्ये सुरू असले तरी सावंतवाडी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केणी हे या पुतळ्याच्या कामावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत, तर प्रसिद्ध चित्रकार राम सुतार हेही अधूनमधून राजकोट किल्ल्यावर भेट देऊन कामाचा आढावा घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR