मुंबई : प्रतिनिधी
गेल्या काही महिन्यांपासून माजी आमदार राजन साळवी यांच्याबद्दल सुरू असलेल्या चर्चांवर अखेर शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आता राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजन साळवी उद्या १३ फेबु्रवारी रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. ही राजकीय घडामोड ठाकरेंना कोकणात धक्का देणारी आहे.
विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासूनच राजन साळवी यांच्या पक्षांतराच्या चर्चांना तोंड फुटले होते. पण, त्या त्यांनी फेटाळून लावल्या होत्या. शिवसेना फुटीनंतरही साळवी ठाकरेंसोबत राहिल्याने त्यांना ‘मातोश्री’चे निष्ठावंत समजले जात होते. परंतु पक्षातीलच स्थानिक नेत्यांसोबत खटके उडाल्याने ते नाराज होते.
राजन साळवी यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राजन साळवी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, राजन साळवी हे गुरुवारी म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघाचे राजन साळवी हे आमदार होते. २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. राजापूर, लांजा आणि साखरपा या भागात साळवी यांना मानणारा मोठा वर्ग आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीतही ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पक्षात कुरबुरी सुरू झाल्या. माजी खासदार विनायक राऊत यांच्यासोबत वाद झाला. त्यात ठाकरेंनी राऊतांची बाजू घेतल्याने साळवी नाराज होते, असे सांगितले जाते.
ठाकरेंचे अनेक नेते संपर्कात असल्याचे दावे
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांकडून गेल्या काही दिवसांपासून याबद्दलचे संकेत दिले जात होते. ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक नेते संपर्कात आहेत, असा दावा उदय सामंत यांनी केला होता. काही आमदार आणि खासदारही संपर्कात असल्याचा दावा शिंदेसेनेकडून केला जात आहे.