मुंबई : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. राजन साळवी भाजपमध्ये जाणार हे जवळपास फिक्स झालं होतं, भाजप नेत्यांशी तशा चर्चा देखील झाल्या होत्या. मात्र सध्या भाजपमध्ये राजन साळवी यांना वेटिंगवर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
राजन साळवी भाजपमध्ये जात असल्याने शिवसेना ठाकरे गटाने त्यांचे परतीचे दोर जवळपास कापले आहेत. त्यामुळे आता राजन साळवी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. राजन साळवी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोन केल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी राजन साळवी यांचा १३ तारखेला प्रवेश करण्यासंदर्भात चर्चा केल्याचे बोलले जात आहे. मात्र अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी शिवसेना प्रवेशाच्या बातम्या चुकीच्या असल्याचे म्हटले होते. ‘मी नाराज आहे, भाजपच्या वाटेवर आहे हे मला तुमच्या माध्यमातून समजतंय. पण या सर्व अफवा आहेत. मी निष्ठावंत सैनिक आहे. बाळासाहेबांचाच सैनिक राहणार आहे. याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही’ असे राजन साळवी म्हणाले होते.
उदय सामंत काय म्हणाले?
साळवी शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘माझी याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झालेली नाही. आम्ही सविस्तर चर्चा करू त्यानंतर ते पक्षामध्ये येत असताना त्यांच्या काय इच्छा-आकांक्षा आहेत, त्याची चर्चा होणे गरजेचे आहे. माझे मोठे बंधू किरण सामंत त्या मतदारसंघात राजन साळवी यांचा पराभव करून निवडून आलेले आहेत त्यामुळे त्यांना देखील विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे, या सर्व गोष्टींचा विचार झाल्यानंतरच एकनाथ शिंदे विचार करतील असे सामंत यांनी म्हटले आहे. सामंत बंधूंचा राजन साळवी यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाला विरोध नसल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.