परभणी : राज्य सरकारच्या वतीने श्री भगवान महावीर स्वामी निर्वाण महोत्सव समितीतर्फे भ. महावीर स्वामी यांच्या जीवन चरित्रावर आधारित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली होती.
या निबंध स्पर्धेत राज्यातील १६ लांखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी स्वस्ति जिनेश काला हिने २ लाख २२ हजार २२२ रूपयांचे रोख द्वितीय पारितोषिक पटकावले आहे. मुंबई येथे रविवार, दि.२ रोजी राजभवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते स्वस्तिचा रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या पारितोषिक वितरण सोहळ्याला कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आ. चैनसुख संचेती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अॅन्ड अॅग्रीकल्चर अध्यक्ष ललित गांधी, हितेशभाई मोता, भाजपा जैन प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी, डॉ. कल्याणमल गंगवाल, छ. संभाजीनगरचे उद्योजक अनिल काला, इंजि. सौरभ सेठीया, यश शाह आदींची प्रमुख उपस्थिती होती. या निबंध स्पर्धेत स्वस्ति काला हिने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
स्वस्तिचे पालक जिनेश प्रकाशचंद काला, पायल काला, विशाल काला, अनिता काला, प्रशासकीय अधिकारी भुजंग देऊळगावकर, शिक्षक अमोल जाधव यांची उपस्थिती होती. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, सीताराम मंत्री, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, प्राचार्य एन.पी. पाटील, भुषण देऊळगावकर आदींसह विविधस्तरांतून स्वस्तिचे अभिनंदन होत आहे.