मुंबई : राज्यातील महायुती सरकारकडून विविध जिल्ह्यात ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनार्थ रविवार दि. ११ मे रोजी पायी यात्रेचे आणि तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सैन्य दलाच्या समर्थनार्थ आणि भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. त्यानंतर, भारतीय सैन्य दल आणि भारत सरकारच्या समर्थनार्थ अनेक जिल्ह्यात ही रॅली निघणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही या रॅलीत सहभाग असणार आहे. यांसह, महायुतीमधील अनेक मंत्री आपल्या आपल्या जिल्ह्यातून या रॅलीत सहभाग घेणार आहेत. मात्र, राष्ट्रवादीकडून तिरंगा रॅलीचे नियोजन नसून अजित पवार हे नांदेड दौ-यावर आहेत. ते शहीद कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत उद्या रविवारी नागपुरात तिरंगा रॅली निघणार असून ऑपरेशन शिंदूर’च्या समर्थनार्थ ही तिरंगा रॅली काढण्यात येत आहेत. या तिरंगा रॅलीत मोठ्या प्रमाणात नागपूरकर सहभागी होणार आहेत. शहरातील लॉ कॉलेज चौक ते शंकर नगर चौक दरम्यान तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: सकाळी ८ वाजता तिरंगा रॅलीत पायी सहभागी होणार आहेत.
राज्यभरात ठिकठिकाणी उद्या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीतही उद्या तिरंगा रॅली निघणार असून ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालापासून रॅलीला सुरुवात होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत खासदार नरेश म्हस्के, हेमंत पवार आणि इतर शिवसेना पदाधिकारी असणार आहेत. ठाणे जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या रॅलीत सहभागी होण्याचे आवाहनही शिवसेना शिंदे गटाकडून करण्यात आले आहे.
तिरंगा रॅली
रत्नागिरित मंत्री उदय सामंत यांच्याकडून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रप्रेमासाठी एकत्र येण्यासाठी तसेच भारतीय सैन्यदलाचे मनोबल वाढवण्यासाठी रत्नागिरी शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. उद्या ११ मे सकाळी ८ वाजता मारुती मंदिर सर्कल ते जयस्तंभ चौकापर्यंत रॅली काढण्यात येईल.
या रॅलीमध्ये रत्नागिरीवासियांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तर, कोल्हापूरच्या ऐतिहासिक दसरा चौकामधून उद्या शिवसेना शिंदे गटाच्यावतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दसरा चौकापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत ही तिरंगा रॅली काढली जाईल.
अजित पवार नांदेड दौ-यावर
राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या रविवारी नांदेड दौ-यावर आहेत. त्यांच्या दौ-याच्या अनुषंगाने चिखलीकर यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. उद्या रविवारी मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे राष्ट्रवादी पक्षाचा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी, अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. तसेच, अजित पवार हे देगलूर येथील शहीद जवान सचिन वनंजे यांच्या कुटुंबीयांना सांत्वन पर भेट देणार आहेत, अशी माहिती आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली.