अकोला : राज्यात वाढलेल्या तापमानामुळे जणूकाही सूर्य आग ओकत असल्याचा अनुभव येत आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून उष्णतेची लाट पसरली आहे. यातच मागील दोन दिवसांपासून अकोला महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण शहर बनले आहे. कारण अकोल्यातील तापमान हे ४४.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
राज्यात झालेल्या अवकाळी पावसानंतर सर्वत्र तापमान वाढले असून उष्णतेची लाट पसरली आहे. राज्यातील बहुतांश शहरातील तापमान हे ४० अंशाच्या पार गेल्याने उष्णतेची तीव्रता वाढली आहे. यातच अकोला शहरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. परवा अकोल्याचा पारा ४३.४ अंशावर होता. तर काल पुन्हा अकोल्याचा तापमानाचा पारा वाढून थेट तापमान ४४ अंशापार गेले आहे.
दुस-यांदा तापमान ४४ अंशाच्या पार
अकोल्यात काल सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून या वाढत्या तापमानाचा परिणाम अकोल्याच्या जनजीवनावर झाला आहे. अकोला जिल्हा प्रशासनाने वाढत्या उन्हामुळे जिल्ह्यातील नागरिकांना स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान ७ आणि ८ एप्रिलला या मोसमातील सर्वाधिक तापमान अर्थातच ४४ अंशापर्यंत गेले होते. आता पुन्हा तापमान ४४ अंश पार गेले आहे.