39.5 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यभरात पावसाचा इशारा

राज्यभरात पावसाचा इशारा

मुंबईतही पावसाची शक्यता वाढली

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात उन्हाचा ताप कायम आहे. तर, दुसरीकडे पावसाला पोषक वातावरणही निर्माण झाले आहे. अनेक भागात पावसाची हजेरी लागण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर मुंबईतही पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील एक-दोन दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भातील काही भागांत अद्यापही उष्णतेची लाट कायम आहे. राज्यभरातील अनेक भागांत आता पावसाचीही हजेरी लागणार असून त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असणारा कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. मात्र राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

यामुळे तयार होणा-या स्थितीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाष्पीभवनाच्या प्रक्रियेलाही वेग आला आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात पावसाचा शिडकावा होत आहे. दरम्यान, राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असले तरी मुंबईतही त्याचा प्रभाव पडू शकतो. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत मुंबईतही हलका पाऊस पडेल. या कालावधीत वातावरणही ढगाळ राहील त्यामुळे काहीसा उकाडाही जाणवेल.

पावसाचा अंदाज कुठे
नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागात आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ भागात सोमवारनंतर पाऊस जोर धरणार आहे. यावेळी ३० ते ४० कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहतील.

किनारपट्टीवरही पावसाचा अंदाज
मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

उन्हाचा चटका कायम
राज्यात पावसाळी वातावरण असले तरी उन्हाचा चटका कायम आहे. काही कालावधीसाठी पाऊस पडल्यानंतर तापमानात घट होत असली तरी, त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होते. बहुतांशी भागात तापमानाचा पारा अजूनही ४० अंशावरच आहे. किनारपट्टीवरील तापमानात मात्र काही दिवसांपासून घट झाली असून ही घट मागील काही दिवसांपासून तशीच आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR