छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारा प्रकार समोर आला आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे या आपल्या मुलीसह यात्रेत गेल्या असताना टवाळखोरांनी त्यांच्या मुलीचे व्हीडीओ, फोटो काढत त्यांच्या सुरक्षा रक्षकांना धक्काबुक्की केल्याचा गंभीर प्रकार घडला. यामुळे संतप्त झालेल्या रक्षा खडसे यांनी मुलींना घेऊन थेट पोलिस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली.
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. फडणवीसजी राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेला तुम्ही वेशीवर टांगले आहे, अशा शब्दांत दानवे यांनी सरकारवर घणाघात केला. महिला सुरक्षिततेच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापले आहे. एकापाठोपाठ अत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने गृहविभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
अंबादास दानवे यांनी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलींची छेड काढल्याच्या प्रकरणावरून संताप व्यक्त केला. मुक्ताईनगरात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचे फोटो, व्हीडीओ काढणा-या टवाळखोरांनी शासकीय गार्ड आणि खडसे यांच्या लोकांना धक्काबुक्की केली. हे प्रकरण घेऊन मंत्री खडसे ताई पोलिस ठाण्यात जात असतील तर राज्यातील गुन्हेगारी प्रवृत्ती किती पाताळात गेली आहे हे दिसते आहे. देवेंद्र फडणवीसजी राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेला वेशीवर टांगले आहे, हेच यातून स्पष्ट होते. काय करताय आपण? साध्या यात्रेत सुरक्षा देता येत नसेल तर मग मुली सुरक्षित आहेत कुठे? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.