19.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरराज्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज बंद

राज्यातील ग्रामपंचायतींचे कामकाज बंद

सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचा निषेध केवळ ३ जिल्ह्यातील ग्रामपंचायती राहणार सुरु

मुंबई : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. राज्यात ठिकठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. शनिवार दि. २८ डिसेंबर रोजी बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. आता राज्यभरातील ग्रामपंचायतीचे कामकाज मंगळवारपासून तीन दिवस बंद राहणार आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि लोकप्रतिनिधींवर होणा-या हल्ल्यांना आळा बसावा, यासाठी कडक निर्बंध बसवावेत, या मागणीला घेऊन आजपासून सरपंच संघटनेने राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनात महाराष्ट्रात एकूण २७,९५१ ग्रामपंचायती सहभागी होत आहेत. ग्रामपंचायत हा पंचायत राजमधील सर्वात खालचा पण महत्त्वाचा भाग आहे. महाराष्ट्रात ३५१ पंचायत समित्या किंवा ब्लॉक पंचायती आहेत. भंडारा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात एकूण ७ पंचायत समित्या असून ५४१ ग्रामपंचायती आणि ८६६ गावे आहेत. ग्रामपंचायतीचे कामकाज पुढील तीन दिवस ठप्प होणार असून याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सांगली, सातारा, कोल्हापुरातील संघटना सहभागी नाहीत
सरपंच संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सरपंच संघटनांच्या आंदोलनात सांगली, सातारा, कोल्हापूरातील संघटना सहभागी होणार नाहीत. राज्यात सरपंचांच्या तीन वेगवेगळ्या संघटना आहेत. तर ९ तारखेला सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील संघटनेने बंद पुकारला आहे.

सरपंच संघटनेची मागणी काय?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाच्या कारची तोडफोड करून पेट्रोलने जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. यावरून सरपंच संघटना आक्रमक झाली आहे. राज्यात अशा घटना घडणे हे अतिशय चिंताजनक असून सरपंचांनी गावगाडा चालवायचा कसा? त्यांच्या सुरक्षेची हमी घ्यायची कुणी? असा सवाल करत अशा घटनावर आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत. सरपंच सुरक्षेसाठी कायदा करावा, हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून त्या मागच्या मास्टर माईंडचा शोध घेण्यात यावा. सरपंच तथा ग्रामपंचायत पदाधिका-यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावे, अशी सरपंच संघटनेची मागणी आहे. महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेतर्फे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही देण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR