27.6 C
Latur
Saturday, August 23, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यातील महापालिकांची प्रारुप प्रभाग रचना जाहीर

राज्यातील महापालिकांची प्रारुप प्रभाग रचना जाहीर

मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड मनपा प्रभाग रचना प्रसिद्ध

मुंबई : प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्त आणि वरिष्ठ अधिका-यांच्या आज झालेल्या बैठकीत १० महापालिकांच्या प्रारूप प्रभाग रचना आजच प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. हरकती सूचना आणि त्यावरील सुनावणी या सगळ््याला विलंब होऊ नये, यासाठी वेळेतच प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे, असे निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, कल्याण-डोंबिवली महापालिकेची प्रभाग रचना जाहीर केली.

मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, छत्रपती संभाजीनगर, वसई विरार, नवी मुंबई या वर्ग अ, ब, क अंतर्गत येणा-या महापालिका आहेत. या १० महापालिकांची प्रारूप प्रभाग रचना संबंधित महापालिकांकडून प्राप्त झाली आहे, ती तातडीने प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हरकती सूचना आणि त्यावरील सुनावणी पुन्हा नगर विकास विभागाकडे पाठवून राज्य निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभाग रचना करण्याच्या वेळापत्रकात कुठल्याही प्रकारे विलंब होऊ नये, यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे.

दरम्यान, मुंबई मनपासह पुणे, पिंपरी-चिंचवड मनपासह नाशिक, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई महापालिकांची प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. यात मुंबई महापालिकेत सदस्य संख्या २२७ कायम आहे. प्रत्येक प्रभागात साधारणपणे लोकसंख्या ४५ ते ६५ हजारांच्या दरम्यान आहे. हरकती व सूचना महापालिका आयुक्त यांचे निवडणूक कार्यालय किंवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय या ठिकाणी नोंदविता येणार आहेत. मुंबईत २७ ठिकाणी प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदवण्यासाठी ४ सप्टेंबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे.

नाशिक मनपाच्या प्रभाग रचनेत कुठलाही बदल केलेली नाही. २०११ च्या लोकसंख्येनुसार १२२ सदस्य संख्या कायम आहे. यात २९ प्रभाग ४ सदस्यीय तर २ प्रभाग (१५ आणि १९) हे ३ सदस्यीय असणार आहेत. यासोबतच कल्याण-डोंबिवली महापालिकेतही १२२ जागांसाठी ३१ प्रभाग असणार आहेत. २९ प्रभागांत ४ सदस्य तर २ प्रभागांमध्ये प्रत्येकी ३ सदस्य असणार आहेत.

पुण्याची प्रारुप
प्रभागरचना जाहीर
आगामी महापालिका निवडणुकीसाठी पुणे महापालिकेकडून प्रारूप प्रभागरचना आराखडा जाहीर करण्यात आला. आगामी महापालिका निवडणुकीसाठी एकूण ४१ प्रभाग असणार आहेत. यात ४० प्रभाग ४ सदस्यीय तर एक प्रभाग ५ सदस्यीय असणार असून निवडून द्यावयाच्या महानगरपालिका सदस्यांची संख्या १६४ आहे. प्रारूप प्रभाग रचना संदर्भात नागरिकांच्या हरकती/सूचना दिनांक २२ ऑगस्ट ते दि. ३ सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत व दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत पुणे मनपा भवन स्वागत कक्ष, पुणे येथे नोंदवता येणार आहे.

पिंपरी-चिंचवडची
प्रभागरचनाही जाहीर
पिंपरी-चिंचवड महापालिकेने ३२ प्रभागांची रचना जाहीर केली. चार सदस्यांचा एक प्रभाग असल्याने एकूण १२८ जागांसाठी ही प्रारुप प्रभाग रचना आहे. यावर ४ सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती नोंदवल्या जाणार आहेत. त्यानंतर ५ ते १२ सप्टेंबर दरम्यान नोंदवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडेल. त्यानंतर १५ सप्टेंबरपर्यंत पालिका आयुक्त नगरविकास विभागाकडे अंतिम प्रभाग रचना सादर करतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR