सातारा : मुंबई
राज्यात कोरोनाचे ७६ नवीन रुग्ण आढळल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. सातारा जिल्ह्यातही कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
१ जानेवारीपासून राज्यात कोरोनाचे एकूण ५९७ रुग्ण आढळले आहेत. राज्यात सध्या कोरोनाचे ४२५ सक्रिय रुग्ण आहेत. तर १६५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. जानेवारीपासून सात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी सहा ते सात जणांना इतर गंभीर आजारांची लागण होती. राज्यात आढळलेल्या ७६ कोरोना रुग्णांपैकी २७ रुग्ण मुंबईत, २१ पुण्यात, १२ ठाणे महानगरपालिका हद्दीत, ८ कल्याण महानगरपालिका, चार नवी मुंबईत, एक कोल्हापूर महानगरपालिका, एक अहिल्यानगर महानगरपालिका आणि दोन रायगड जिल्ह्यात आढळले. याशिवाय सातारा जिल्ह्यात २ रुग्ण आढळले आहेत.
नागरिकांनी घाबरू नये
जानेवारी २०२५ पासून मुंबईत एकूण ३७९ रुग्णांची नोंद झाली आहे. जानेवारीपासून राज्यात ९,५९२ कोविड-१९ चाचण्या घेण्यात आल्या. बरे झालेले सर्व रुग्ण सौम्य संसर्गाने त्रस्त होते, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली. मृत्यू झालेल्या सात कोरोना रुग्णांना नेफ्रोटिक सिंड्रोम, किडनी रोग, ब्रेन स्ट्रोक (सेरेब्रोव्हस्कुलर रोग), डायबेटिक केटोऍसिडोसिस, इंटरस्टिशियल फुफ्फुसाचा आजार आणि मधुमेह यासारख्या आजारांनी ग्रासले होते. राज्यात पुरेशा प्रमाणात कोरोना व्हायरस चाचणी कीट आणि पुरेशा उपचार सुविधा उपलब्ध आहेत. लोकांनी घाबरू नये, असे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे.
सातारा, कराडमध्ये कोरोनाचे रुग्ण
सातारा आणि कराडमध्ये प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. त्यांच्यावर क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आणि कराडमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दोन्ही रुग्णांची प्रकृती बरी आहे. मात्र, बदलत्या वातावरणामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.