बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एसटीच्या वाहकाचा मृत्यू झाला आहे. या वाहकाचा मृत्यू हा उष्माघाताने झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. संजय भगवान मोरे (वय ३० वर्षे) असे या मृत वाहकांचे नाव आहे. ते चिखली डेपोमध्ये कार्यरत होते. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त असून उष्मघाताच्या घटना घडण्यास सुरुवाती झाली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, संजय भगवान मोरे हे चिखली डेपोमध्ये कार्यरत होते. ते रविवारी बु-हाणपूर येथून बस घेऊन आले होते. त्यांना पुन्हा एकदा ड्युटीवर जायचे होते. मात्र त्याचपूर्वी त्यांना त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. उष्माघातामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिका-यांनी वर्तवला आहे.
छ. संभाजीनगरमध्ये घडली घटना
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसची वाट पाहात उभ्या असलेल्या एका प्रवाशाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. अमोल दामोदर बावस्कर असे उष्माघातामुळे मृत्यू झालेल्या या २५ वर्षीय तरुणाचे नाव होते.