28.8 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली

राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली

नागपूर दंगलीवरून विरोधकांचा संताप

मुंबई : प्रतिनिधी
नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवरून दंगल झाली आहे. यामुळे नागपूरमध्ये महाल परिसरामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. जमावाने दगडफेक, जाळपोळ केली असून पोलिसांवर देखील हल्ला केला. या दंगलीमध्ये तब्बल ३४ पोलिस जखमी झाले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगितले आहे. नागपूरमधील काही भागांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यावरून मात्र आता विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘‘ही दंगल आम्ही पाहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी पाहिली असती तर दंगलखोर कुठल्या जातीच्या, कुठल्या पक्षाचा, कोणत्या गटाचा हे न पाहता महाराष्ट्रासारखा राज्यातली कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ते कठोर पावले उचलतील. हे दंगल पेटवणारे कोण आहेत आणि दंगल का पेटवली जात आहे? गुढीपाडव्याला देखील दंगली उसळवण्याचा आपलेच लोक प्रयत्न करतील. औरंगजेबाची ढाल करून काही लोक महाराष्ट्रात दंगली उसळवत आहेत, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, सरकार तुमचं आहे तर दंगली कशाला भडकवत आहात? मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांनी कुदळ-फावडा घेऊन जावं आणि लोकांच्या इच्छा पूर्ण कराव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे ते मेमोरियल आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारधारा आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे महत्त्व कमी करायचे. महाराष्ट्राच्या जनतेने या कारस्थानापासून सावध राहिले पाहिजे, असे स्पष्ट मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.

दंगल करणारे हे विश्व हिंदू परिषदेचे
खासदार संजय राऊत यांनी बाबरीचे आंदोलन हे वेगळे होते अशी भूमिका मांडली. ते म्हणाले की, बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा लढा हा राम मंदिरासाठी होता. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन दंगली पेटवत आहेत तर हे गृहमंत्र्यांचा फेल्युअर आहे. ही लोक कोण आहेत जे दंगे पसरवत आहेत? हे विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत किंवा संघाचे लोक आहेत. त्यांचे चेहरे कळत आहेत. फडणवीसांना ते लोक माहीत असतील, असा गंभीर आरोप खासदार राऊत यांनी केला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर दंगल पॅटर्न
पुढे ते म्हणाले की, ‘‘हिंदूंना भडकविण्यासाठी हिंदूंवर हल्ले केले जात आहेत, हा नवीन पॅटर्न आता सुरू आहे. महाराष्ट्रात हा नवीन दंगल पॅटर्न तयार झालेला आहे. अशा दंगली पेटून २०२९ च्या निवडणुकींना सामोरे जायचे असा हा दंगल पॅटर्न आहे. औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण हे महाराष्ट्रात कोणीही करू नये, तुमचीच माणसं हे करत आहेत. इतिहास मान्य केल्यावर तुमची माणसं जर कुदळ-फावडी घेऊन तिकडे गेली असती तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करा हे संघटित गुन्हेगार आहेत,’’ असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR