मुंबई : प्रतिनिधी
बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये कर्मचा-याला सर्वांसमोर बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद पावसाळी अधिवेशनातही उमटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी फडणवीस सरकारला बदनाम करण्याचा शिंदेंच्या आमदारांचा प्रयत्न का? असा सवाल केला आहे. तसेच, यावेळी त्यांनी राज्यात सत्तापक्षाच्या माध्यमातून गुंडाराज सुरू झाले आहे, असा आरोप केला आहे.
मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधील निकृष्ट जेवणावरून शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राडा घातला होता. याबद्दल विरोधकांनी संताप व्यक्त केला.
काँग्रेसचे आमदार नाना पटोले म्हणाले की, या सरकारमध्ये काय चालले आहे हे आपण पाहिले असेल. संजय गायकवाड यांनी कर्मचा-याला केलेली मारहाण ही देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी होती का असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्यात सत्तापक्षाच्या माध्यमातून जे गुंडाराज सुरू झाले आहे ते अशोभनीय आहे. कायदा हातात घेण्याची परंपरा या सरकारने सुरू केली आहे, असे म्हणत आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनच्या कर्मचा-याला केलेल्या मारहाणीबद्दल त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
सरकारचे आमदार असतील की मंत्री असतील त्यांना काय माज आला आहे हे आपण सगळ्यांनी पाहिले आहे. त्यांच्यातूनच एका कर्मचा-याला आमदाराने मारहाण केली. या प्रकरणी सरकारने तातडीने लक्ष घातले पाहिजे. गरीब माणसांवर अत्याचार करण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्तेत पाठवले नाही. त्या डाळीमध्ये काही गडबड असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार आहे, असे नाना पटोले म्हणाले. तसेच, सत्तेचा माज या लोकांना आला आहे म्हणून हे लोक सामान्य माणसांना मारत आहेत. आपल्याकडे सत्ता असताना अशी मारहाण करण्याची गरज काय? गरीब माणसांना मारण्याचा अधिकार यांना कोणी दिला? असा सवाल पटोले यांनी केला आहे.
शिळे जेवण दिल्याचा आरोप
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्याचा आरोप करत आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचा-याला बेदम मारहाण केली. कॅन्टीनमधील कर्मचा-यांनी शिळे जेवण दिल्याचा आरोप करत संजय गायकवाड यांनी मारहाण केली. या घटनेचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गायकवाड यांचे वर्तन चुकीचे असल्याचे म्हटले आहे.