20.5 C
Latur
Friday, January 31, 2025
HomeUncategorizedराज्यात जीबीएसचे एकूण १२७ रुग्ण

राज्यात जीबीएसचे एकूण १२७ रुग्ण

पुण्यात एका ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू
पुणे : प्रतिनिधी
राज्यातील गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) रुग्णसंख्या १२७ वर पोहोचली असून, आणखी एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात ५६ वर्षीय महिलेचा जीबीएसने मृत्यू झाला. जीबीएसच्या रुग्णसंख्येत वाढ सुरू झाल्यापासून राज्यातील हा दुसरा रुग्ण मृत्यू ठरला.

मंगला उमाजी चव्हाण (५६) असे जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या सिंहगड रस्त्यावरील नांदोशी येथील रहिवासी होत्या. त्यांना १५ जानेवारीला अशक्तपणा आणि अर्धांगवायूची लक्षणे जाणवू लागली. त्यांना नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना १७ जानेवारीला ससून रुग्णालयात हलविण्यात आले. ससूनमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा २८ जानेवारीला मृत्यू झाला. श्वसनक्रिया थांबण्यासह अर्धांगवायूमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.

राज्यात जीबीएसची रुग्णसंख्या आता १२७ झाली असून, त्यातील २० जण व्हेंटिलेटरवर आहेत. राज्यातील रुग्णांमध्ये २३ रुग्ण हे पुणे महापालिका क्षेत्रातील असून, ७३ रुग्ण हे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील आहेत. याचबरोबर पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील १३, पुणे ग्रामीणमधील ९ आणि इतर जिल्ह्यांतील ९ रुग्ण आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR