मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सक्तीची करा असे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी माय मराठीवर लक्ष दिले पाहिजे. मराठी भाषा कागदावर सक्तीची झाली असेल. जोपर्यंत मराठी भाषा सक्तीची होत नाही तोपर्यंत मराठी भाषेला स्थान मिळणार नाही असे राऊत म्हणाले. मराठीविषयी भाजपाच्या लोकांना ठामपणे बोलताना पाहिलं आहे का? महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये या लोकांचं योगदान नाही, असे म्हणत राऊतांनी भाजपवर टीका केली. बेळगावात मराठी भाषेवर इतका अत्याचार होत असताना भाजपच्या लोकांनी तोंड वर केले आहे का? असा सवाल राऊतांनी केला.
हिंदीला वैधता नसली तरी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना इंग्रजी येत नाही म्हणून आमच्यावर हिंदी लादू नका असे राऊत म्हणाले. या महाराष्ट्रातून हिंदी सिनेमा, हिंदी गाणी, हिंदी साहित्य, नाटक यांचा उगम झाला आहे. जिथे हिंदी नाही तिथे सक्ती करू नका असे राऊत म्हणाले. देशात हिंदीविषयी आस्था व प्रेम आहे, संवाद भाषा आहे ती पण अभ्यासक्रमात सक्ती नको असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात सर्वांत आधी सर्व प्रकारच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची केली पाहिजे असे राऊत म्हणाले.
मराठी राजभाषा आहे.. तिच्या डोक्यावर राजमुकुट
कुठलातरी पक्ष हिंदीची मागणी करतो, शिवाजी पार्कवर जाऊन नेत्यांशी चर्चा करतात. कुठल्यातरी सागर बंगल्यावरून ते ट्विट तयार करून आलं होतं इतकी तत्परता असू शकते असा टोला राऊतांनी राज ठाकरेंना लगावला. विद्यार्थ्यांवर ओझे लादू नका. आम्हाला हिंदी शिकवू नका, गुजरातला शिकवा असेही राऊत म्हणाले. कुठून तरी आलेली स्क्रिप्ट वाचू नका, तुम्ही कधी हिंदू झालात, कधी हिंदू असतात कधी मराठी असतात काहीतरी ठरवा असेही राऊत म्हणाले. राज ठाकरे यांच्या निवेदनाबद्दल देखील राऊतांना विचारण्यात आलं, यावेळी राऊत म्हणाले की, हे देवेंद्र फडणवीस यांना सांगा. त्यांच्या संगनमताने नाटक चालले आहे, त्यांना परत चहाला बोलवा, असे राऊत म्हणाले.