नाशिक : प्रतिनिधी
रोहित पवार शनिवारी नाशिक दौ-यावर होते. त्यांनी पत्रकार परिषदेत विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर चांगलाच निशाणा साधला. राज्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, महिलांना संरक्षण देण्यात महिला आयोग अपयशी ठरला आहे असे रोहित पवार म्हणाले.
दरम्यान, महिला आयोग ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे, त्या पद्धतीने काम करत नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. महिला आयोग कुठल्याही राजकीय पक्षाची शाखा नाही. आयोगात अराजकीय व्यक्ती नेमल्यास त्यांच्यावर दबाव येणार नाही. आगामी अधिवेशनात याबाबत मागणी करणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
महिला आयोग ही घटनात्मक व स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे महिला आयोगावर राजकीय व्यक्ती नसावी. महिला आयोगाच्या सध्याच्या कार्यपद्धतीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारने महिला आयोगाचा राजीनामा मागावा. आयोगात अध्यक्ष व सदस्य सक्षम असावेत. त्यांच्या नियुक्तीसाठी पात्रतेचे निकष ठरविण्याची गरज असल्याचे पवार म्हणाले.
महिला अत्याचाराची प्रकरणे राज्यात वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे काहीतरी थातूरमातूर उत्तरे न देता महिलांच्या सुरक्षिततेसाठी आपल्याला काय करता येईल यावर विचार व्हायला हवा. त्यादृष्टीने प्रशासनाने यात वेगळ्या प्रकारचे नियोजन केले पाहिजे, ज्यात महिलांना स्वत:हून पुढाकार घ्यावासा वाटेल, तिथे त्यांच्या अडचणी दूर होतील.
यावेळी लाडकी बहीण योजनेवर बोलताना ते म्हणाले, महायुती सरकारने सत्तेत येण्यासाठी ही योजना राबविली. मात्र आता या योजनेमुळे इतर विभागाच्या योजनांवर परिणाम होताना दिसत आहे. महायुती सरकारमध्ये राज्यातील शेतकरी, दिव्यांग, आदिवासींचा निधी लाडकी बहीण योजनेत वळविला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत येत्या १० जूनला ज्येष्ठ नेते शरद पवार पक्षाची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्ह्यात इतर पक्षांकडून स्वबळाचा नारा दिला जात असताना शरद पवार काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.