14.7 C
Latur
Wednesday, January 8, 2025
Homeमहाराष्ट्रराज्यात शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र ठप्प

राज्यात शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र ठप्प

 

मुंबई : प्रतिनिधी
बारदाना तुटवड्याने राज्यातील अनेक सरकारी सोयाबीन खरेदी केंद्रच ठप्प असून शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र चालकांनाही ही खरेदी पूर्वपदावर कधी येणार याबाबत कल्पना नसल्याचे समोर आले. सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र गेल्या १२ दिवसांपासून बंद असून राज्यभरातील अनेक खरेदी केंद्रांवर शुकशुकाट आहे.

राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ सोयाबीनची खरेदी करत आहेत. राज्यभरात ५८५ केंद्रांना सोयाबीन खरेदीची परवानगी असली तरी प्रत्यक्ष खरेदी मात्र केवळ ५६१ केंद्रांनी सुरू केली होती. त्यातही अडचणी असून प्रत्यक्ष खरेदी सुरू असलेल्या केंद्रांमध्ये बारदान्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने खरेदी केंद्रच बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे .

सोयाबीन उत्पादक शेतक-यांसाठी सरकारने सुरू केलेली हमीभाव खरेदी केंद्र ठप्प झाली असून धाराशिवची शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र गेल्या बारा दिवसांपासून बंद असल्याची माहिती आहे. सरकारी सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र बारदाना (पोते) नसल्याने बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. सोयाबीन खरेदी केंद्र बंद असल्याची केंद्र चालकांकडून खरेदी केंद्रांवर बॅनरबाजी सुरू आहे. खरेदी केंद्रच ठप्प असल्याने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केलेल्या २५% शेतक-यांची खरेदी झाली नाही.

शेतक-यांकडील खरेदी बाकी : सोयाबीन हमीभाव विक्रीसाठी ३१ डिसेंबर पर्यंत राज्यातील ६ लाख ७९ हजार शेतक-यांनी नोंदणी केली. मात्र प्रत्यक्षात सुमारे दीड लाख शेतक-यांचीच खरेदी होऊ शकली. म्हणजेच नोंदणीकृत शेतक-यांपैकी केवळ २५ टक्केच शेतक-यांच्या सोयाबीनची खरेदी झाली आहे. ७५ टक्के शेतक-यांना सोयाबीन विकायचे आहे.

किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्यात सोयाबीनची खरेदी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने सुरू आहे. आतापर्यंत सोयाबीनची ३ लाख ३४ हजार ३३१ मेट्रिक टन एवढी विक्रमी खरेदी झाली. मागील वर्षी केवळ ७ हजार ४०० क्विंटल एवढी खरेदी झाली होती. यावर्षी शेतक-यांना १ हजार कोटी रुपये मोबदला देण्यात आला आहे. राज्यात सध्या ५६१ खरेदी केंद्र सुरू असून आतापर्यंत ६ लाख ६९ हजार शेतक-यांनी नोंदणी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR