31.1 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeमहाराष्ट्रराज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री हवा

बीडमध्ये महिला वकिलाला मारहाण; काँग्रेस आक्रमक

मुंबई : प्रतिनिधी
वकील असलेल्या एका महिलेला जर संरक्षण नसेल, तर सामान्य महिलांचे काय? महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर प्रशासनाने तात्काळ दोषींवर गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करावी तसेच त्यांना कठोर शासन करा, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर केली आहे.
दरम्यान, बीड जिल्हा गेल्या काही महिन्यांपासून वाईट कारणांमुळे चर्चेत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या घटनेनंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना सातत्याने उघडकीस येत आहेत.

डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यामुळे एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात घडली. लाठ्याकाठ्या आणि पाईपच्या मदतीने ही मारहाण झाल्याचे आरोप करण्यात येत आहेत. घडलेल्या प्रकाराचे फोटोही व्हायरल झाले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सत्र न्यायालयात वकिली करणा-या एका महिलेला गावातील ध्वनिप्रदूषणाविरोधात कार्यालयीन तक्रार केल्याच्या कारणावरून सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी शेतात नेऊन बेदम मारहाण केली. काठ्या आणि लोखंडी पाईप वापरून झालेल्या हल्ल्यामुळे ती महिला बेशुद्ध पडली, आणि नंतर तिला केवळ एका रात्रीत रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत सरकारच्या अपयशाची साक्ष देतो.

शरद पवार गटही आक्रमक
शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंनीही ट्विट करत राग व्यक्त केला. मुख्यमंत्री महोदय हे फोटो पहा आणि तुम्हाला झोप कशी लागते ते सांगा? डीजेच्या आवाजाचा त्रास होत असल्याने त्याची तक्रार केल्याने एका महिला वकिलाला गावच्या सरपंचाने कार्यकर्त्यांसोबत मिळून बेदम मारहाण केल्याची घटना बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील एका गावात घडली आहे. लाठ्या-काठ्या आणि पाईपच्या मदतीने केलेल्या या मारहाणीत महिला वकील जबर जखमी झाल्या आहेत. वकील असलेल्या महिलेला जर मारहाण होत असेल तर या राज्यात कायद्याचा धाक किती आहे हे दिसून येते. या घटनेमुळे महाराष्ट्र आता बिहारच्याही पुढे गेलाय असे दुर्दैवाने म्हणावे लागत आहे, असे म्हणत त्यांनी गृहमंत्रालयाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR