मुंबई : हिंदुत्वाच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यासोबत त्यांनी भाजपाने राम मंदिर बांधले नसल्याचे म्हटले आहे. भाजपाने आधी रोजी-रोटीबद्दल बोलायला हवे. शेतकरी-महिला-गरीब-तरुण या मुद्यावर की हिंदुत्वाच्या मुद्यावर… ते कोणत्या मुद्द्यावर लढत आहेत हे त्यांनी सांगावे? राम मंदिर भाजपाने बांधलेले नाही, हा न्यायालयाचा निर्णय होता.
बाबरी मशीद पाडण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली, मुख्यमंत्री म्हणून मी विधानसभेत हिंदुत्वावर बोललो आहे. लोकांना ते माहीत आहे. पण आज माझ्यासाठी सर्वात मोठा मुद्दा हा आहे की, मला मोदी सरकार नाही तर भारत सरकार हवे आहे. जर एकच पक्ष असेल तर ते देशासाठी सर्वात धोकादायक आहे. माझ्या वडिलांच्या काळात एक मजबूत सरकार असावे असे आम्हाला वाटत होते, पण अटलजींनी आघाडीचे सरकार यशस्वीपणे चालवले, नरसिंह राव यांच्या सरकारने आर्थिक सुधारणा आणल्या. आता काळाप्रमाणे देशाला अशा सरकारची गरज आहे जे अनेक पक्षांना सोबत घेईल असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांना यावेळी पुन्हा भाजपासोबत जाण्याची काही शक्यता आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर थेट उत्तर दिले आहे. मी असे का करू? माझा एकापेक्षा जास्त वेळा विश्वासघात झाला आहे. माझ्या दृष्टीने भाजपाचा खरा चेहरा उघड झाला आहे असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच आमचे हिंदुत्व त्यांच्या हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे. आपले हिंदुत्व घरातील चूल पेटवणार आहे. भाजपाचे हिंदुत्व हे घर जाळणारे आहे.
आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही, फक्त देशद्रोही म्हणजेच देशाशी गद्दारी करणा-यांच्या विरोधात आहोत. भाजपा म्हणते चार जाती आहेत तरुण, शेतकरी, महिला आणि गरीब. तरुणांना नोक-या कुठे आहेत? शेतक-याच्या म्हणण्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. गृहमंत्री या नात्याने अमित शाह यांना मणिपूरमधील महिलांवरील गुन्ह्यांची माहितीच नव्हती, असे दिसते. तुम्ही गरिबांना गरिबीत ठेवता असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे.