पुणे : प्रतिनिधी
भारतीय सैन्याने हाती घेतलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने ‘भारत जिंदाबाद’ रॅली काढण्यात येणार असल्याचे आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आरपीआयच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच देशातील महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘भारत जिंदाबाद’ रॅली आयोजित करण्यात येईल,जम्मू काश्मीर जोपर्यंत भारताच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत लढाई सुरूच ठेवावी,अशी पक्षाची भूमिका असल्याचे आठवले यांनी स्पष्ट केले.
दीर्घकाळ रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत पार पाडाव्या,असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या निवडणूक प्रक्रियेला वेग आला आहे.या निवडणुका भाजप,शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि आरपीआय यांनी महायुती म्हणून एकत्रित लढवाव्या,अशी पक्षाची भूमिका आहे.
महायुतीतील घटक पक्षाच्या प्रमुखांना भेटून आपण ही भूमिका मांडणार आहोत. या निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे,अशी देखील आग्रही मागणी आहे त्यासंबंधी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा झाली असून मागण्यांना योग्य प्रतिसाद मिळेल,अशी आशा व्यक्त केली.त्याचप्रमाणे आगामी काळात विविध महामंडळे,जिल्हा नियोजन मंडळ यावरील नियुक्तींमध्ये देखील पक्षाला योग्य प्रतिनिधित्व मिळावे,अशी मागणीही त्यांनी केली.
आंबेडकरी चळवळीतील सर्वच गटातटांनी एकत्र यावे ही भूमिका कायमच मांडत आलो आहोत.माझ्यासाठी मंत्रीपद महत्त्वाचे नाही तर समाजाची प्रगती महत्त्वाची आहे.समाजाची प्रगती साधण्यासाठी सर्व आंबेडकरी गट एकत्र येत असतील तर त्याचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आनंदाने सोपवू,असेही आठवले यांनी स्पष्ट केले.