लातूर : प्रतिनिधी
अभिजात फिल्म सोसायटी आणि दयानंद शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या अभिजात शॉर्ट फिल्म फेस्टिवल ला लातूरच्या रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलचे उदघाटन सोमवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले .
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना अनेक मान्यवरांनी सिनेमा संस्कृती रुजण्यासाठी लघुपट महोत्सव गरजेचे असल्याचे सांगितले. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक संतोष पाठारे यांनी त्यांच्या मनोगतात मराठवाडयात सिनेमा संस्कृती रुजण्यासाठी अशा लघुपट महोत्सवांची गरज अधोरेखित केली. तीन तास लांबीच्या सिनेमापेक्षा लघुपटातून गोळीबंद कथा अधिक प्रभावीपणे मांडली जाते. त्यामुळे हे माध्यम अधिक परिणामकारक ठरते, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विनोद कांबळे यांनी लघुपट निर्मिती म्हणजे मुख्य लांबीच्या सिनेमाच्या निर्मितीतले पहिले पाऊल असल्याचे नमूद केले. अशा लघुपट महोत्सवातून तरुण निर्माते- दिग्दर्शक आपल्यातल्या कलेला तपासून सिनेमा निर्मितीचे तंत्र अधिक विकसित करू शकतात असेही ते म्हणाले.
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणावर थेट आणि अचूक भाष्य करणारा तोयम हा माहितीपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. दारं, प्रश्न, कॅनव्हास, आम्ही भारताचे मुरकुल, आणि भगवान सारख्या सिनेमांनी आपल्या आसपासच्या ज्वलंत विषयावर भाष्य केले. तर वृंदावन, कुरल- ७५, पाणथळ, मिरग आणि तू आहेस ना या संवेदनशील विषयावरच्या लघुपटांनीही प्रेक्षकांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजात फिल्म सोसायटीचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमास दयानंद महाविद्यालयाचे शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच अभिजात फिल्म सोसायटीचे पदाधिकारी आणि लातूरकर प्रेक्षक मोठया संख्येने उपस्थित होते. हा फिल्म फेस्टिव्हल दोन दिवस चालणार आहे.