लातूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवरायांचा जयजयकार, एक मराठा लाख मराठा, मनोजदादा तूम आगे बढ हम तुम्हारे साथ है, अशा घोषना देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करुन गावा गावांतून हजारो मराठे मनोज जरांगे यांच्यासमवेत मुंबईला जाण्यासाठी बुधवारी अंतरवाली सराटीकडे मार्गस्थ झाले. अनेकांनी तर अगदी मध्यरात्रीपासून आंतरवाली सराटीचा रस्ता धरला होता. आरक्षण मिळाल्या शिवाय मुबंई सोडायची नाही आता हाच आपला निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
लातूर शहरात बुधवारी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक मराठा बांधव आले त्यांनी छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. छत्रपती शिवराय तसेच आरक्षण समर्थनाच्या त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. यावेळी त्यांना पाठवण्यासाठी समाजबांधव आले होते. या नियोजीत आंदोलनाची जोरदार पूर्वतयारी करण्यात आली होती. टेम्पो , ट्रक, जीप कार, खासगी बसेस बुक करण्यात आल्या होत्या. प्रत्येक वाहनावर लावण्यात आलेले स्टीकर्स, बॅनर्स, लक्ष वेधत होती. बुधवारी मार्गस्थ झालेल्या बांधवांनी त्यांना किमान १५ दिवस पुरेल एवढा शिधा, स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य सोबत घेतले आहे. एका मोठ्या वाहनात हे साहित्य असून आचारीही सोबत आहेत. दरम्यान बुधवारी अनेक समाजबांधवांनी मार्गावर चहा नाष्त्याची सोय केल्याचे समाजबांधवांनी सांगितले. दरम्यान बुधवारी रात्री अनेकजण शिवनेरीकडे मार्गस्थ झाले तेथून ते जरांगे यांच्या समवेत जातील.