मुंबई : प्रतिनिधी
‘लाडकी बहीण’ योजनेचा परिणाम इतर योजनांवरही होत असल्याचे स्पष्ट होत आहे. आता या योजनेचा फटका शेतक-यांनाही बसतोय का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, ठिबक सिंचन योजनेसाठी देण्यात येणारे अनुदान गेल्या वर्षभरापासून शेतक-यांना मिळालेले नाही. याचा फटका विशेषत: मराठवाड्यातील शेतक-यांना बसत आहे.
एकट्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतक-यांचे ५ कोटी ६० लाख रुपये सरकारकडे थकित आहेत. या अनुदानाच्या विलंबामुळे शेतक-यांना ठिबक सिंचनाचा लाभ घेता येत नाही, परिणामी जलसंधारणाच्या उद्दिष्टांवरही परिणाम होत आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे इतर योजनांना फटका बसत असल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. शिवभोजन योजनेसारख्या योजनांना आळा घालण्याचे कारण लाडकी बहीण योजना असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर ‘ही योजना बहिणींसाठी नव्हे, तर सत्तेसाठी होती’, असा घणाघात माजी आमदार बच्चू कडू यांनी केला.
दरम्यान, या योजनेतून ५ लाख महिलांची नावे वगळली गेल्याचा मुद्दा उचलून धरत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली. ‘‘महिलांना एकदा पैसे दिले, त्यावर मते घेतली, आणि आता त्यांना योजनेतून वगळले जात आहे. हे सरकार चुकीचे करत आहे. लाडक्या बहिणींवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत,’’ असे जयंत पाटील म्हणाले.
राज्यात महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत लाखो प्रशिक्षणार्थींना विविध सरकारी कार्यालयांत नेमले होते. मात्र, सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या तरुणांना कामावरून कमी करण्यात येत आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने तरुण बेरोजगार होणार आहेत.
याविरोधात सांगलीत प्रशिक्षणार्थी तरुणांचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज यांच्या पुढाकाराने हा मेळावा होत असून, या तरुणांना न्याय मिळावा यासाठी आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. ‘लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांकडे दुर्लक्ष करू नका!’ असा संदेश या तरुणांकडून सरकारला दिला जात आहे.