23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeलातूरलातुरात शिवजन्मोत्सव सोहळा, जिल्हाधिका-यांच्या हस्ते झुलणार पाळणा

लातुरात शिवजन्मोत्सव सोहळा, जिल्हाधिका-यांच्या हस्ते झुलणार पाळणा

लातूर : प्रतिनिधी
येथील छत्रपती शिवाजी महाराज  सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने प्रथमच शिवजन्मोत्सवाचा नेत्रदीपक सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि. १८ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री साजरा करण्यात येणार असून  जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते बाल शिवबांचा पाळणा झुलवून त्यास प्रारंभ होणार आहे. या वेळी वीर माता, वीर पत्नी, महिला अधिकारी, कर्मचा-यांसह मोठ्या संख्येत महिला मुलीं व शिवप्रेमींची उपस्थिती राहणार आहे. शिवकाळाला साजेल असे  या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे स्वरुप राहणार असून त्यासाठीची तयारी व  नियोजन समितीने सुरू केले आहे. या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौक तसेच पुतळा परिसर भगव्या पताका व विद्युत रोषणाईने सजवला जाणार  असून  पुतळ्याचे कठडे व  आतील भागात फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार आहे. मुख्य कार्यक्रमापूर्वी २ ते ३ तास अगोदर  महिला शाहीर शिवरायांचे पोवाडे, शिव गिते सादर करणार आहेत.
शिवरायांच्या पुतळ्यासमोर सजवलेला पाळणा राहणार असून त्यात बाल शिवबांची मूर्ती  असेल. रात्री १२ वाजले की  तुता-यांचा निनाद, फुलांची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली  जाईल.   या वेळी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते बाल शिवाजींचा पाळणा झुलवला जाईल व पाळणे गायले जातील. या वेळी वीर माता, वीर पत्नी यांच्यासह  विविध विभाग व क्षेत्रांतील महिला अधिकारी-कर्मचारी विद्यार्थिनींची उपस्थिती असेल.  पाळणा झाल्यानंतर मान्यवरांसह वीर माता, वीर पत्नींचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात येईल. साखर वाटपाने या कार्यक्रमाची सांगता होईल.
शिवजन्मोत्सवानिमित्त दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी दि. ९ वाजता क्रीडा बुध्दिबळ स्पर्धा,  दि. १४ फेब्रुवारीस राजर्षी शाहू महाविद्यालयात रक्तदान शिबिर, व्याख्यान दि. १५ फेब्रुवारीस जिजामाता कन्या प्रशाला येथे रांगोळी स्पर्धा, दि. १७ फेब्रुवारीला ज्ञानेश्वर विद्यालयात व्याख्यान,  दि. १८ फेब्रुवारी रोजी शिवणी (खु.), ता. लातूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रात्री ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, लातूर येथे आम्ही जिजाऊच्या लेकी हा पोवाडे, स्फूर्ती गिते व लोकगितांचा मराठमोळा कार्यक्रम होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR