26.8 C
Latur
Wednesday, February 26, 2025
Homeलातूरलातूरच्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी आज लातूरकर एकवटणार

लातूरच्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी आज लातूरकर एकवटणार

लातूर : प्रतिनिधी
लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील कन्या भाग्यश्री सूर्यकांत सुडे हिचा पुणे येथे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतरही आरोपींच्या वतीने तिच्या कुटुंबीयांकडे खंडणी मागण्यात येत होती. या अतिशय अमानुष खुनाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा आणि सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांची नेमणूक करून दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, याकरिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दि. १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून मोर्चा काढण्यात येणार असून लातूरकरांनी आपल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन विविध संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
लातूर तालुक्यातील हरंगुळ येथील भाग्यश्री सूर्यकांत सुडे हि शिक्षणाच्या निमित्ताने पुणे येथे रहीवसास होती. दि. ३० मार्च रोजी तिचे अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला. आरोपींनी तिची हत्या करण्यापूर्वीच अहमदनगर जवळील सूपा परिसरातील निर्मनुष्य ठिकाणी तिला पुरण्यासाठी खड्डा खोदून ठेवला होता. त्यापुढे जावून खुनानंतर पाच दिवस कुटुंबीयांना खंडणी मागण्यात येत होती. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून यामुळे समस्त पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
भविष्यात तरी अशा घटना घडू नयेत आणि मयत भाग्यश्री सुडे हिला न्याय मिळावा यासाठी आज लातूरकर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे सकाळी ९ वाजता लातूर मधील नागरिक, विद्यार्थी, विविध संस्थांचे प्रतिनिधी एकत्रित येवून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी न्याय मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय आणि समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे या मोर्चाचा समारोप  होणार आहे. यानंतर निवडक महिला आणि मुली जिल्हाधिकारी यांची भेट घेवून निवेदन सादर करणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR