लातूर : सिध्देश्वर दाताळ
मागील काही दिवसापाून शहरातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. सोन्याच्या भावा बरोबरच चांदीचे दरही गगनाला भिडले आहेत. अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे सोन्याचे दर चांगलेच भडकले असल्याने सोने-चांदीच्या वाढ होत असल्याचे व्यापरी हाणमंत वाघ यांनी एकमतशी बोलताना सांगीतले.
सराफा बाजारातील इतर व्यापा-यांच्या मते येणा-या काळात सोन्याच्या दरात आणखी मोठी वाढ पाहायला मिळू शकते. याचाच अर्थ लवकरच सोन्याचा भाव प्रति तोळा १ लाख २० हजार पर्यंत पोहोचू शकतो. दुसरीकडे शहरातील सराफ बाजारात देखील सोन्याच्या किमतीमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. १० एप्रिल रोजी शहरातील सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचे दर प्रतितोळा ९३ हजार ५०० रुपयांनी होते. तर २२ कॅरेट सोने ८७ हजार ५०० प्रतितोळा व चांदी ९५ हजार ५०० प्रतिकिलो होते. यात दि. १९ एप्रिल रोजी सराफा बाजारात २४ कॅरेट सोने ९६ हजार रूपये, २२ कॅरेट सोने ९० हजार ४०० रूपये, चांदी ९८ हजार ५०० रूपयांचा विना जिएसटी भाव निघाला आहे. लग्नसराईचा हंगाम आणि सोन्याच्या वाढत्या मागणीमुळे आज शहरातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात तब्बल प्रति तोळयामागे ३ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
लातूरमध्ये २४ कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा ९६ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. सराफा बाजारातील व्यापा-यांकडून सोन्याच्या भावाबाबत माहिती देण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते जोपर्यंत अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारी युद्ध सुरू राहील तोपर्यंत सोन्याचे भाव वाढतच जाणार आहेत. सोन्याचे दर यावर्षात १ लाख २० हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. गतवर्षापासून सोन्याच्या दरात सातत्यानं चड-उतार सुरूच आहे. लातूरातच नाही तर देशातील इतर शहरांमध्ये देखील सोन्याचे दर चांगलेच कडाडले असल्याचे व्यापा-यांनी सागीतले.