लातूर : प्रतिनिधी
लातूरच्या भूमीतील प्रख्यात लेखक, ज्येष्ठ कथाकार, साहित्यिक रावसाहेब रंगनाथ बोराडे उर्फ रा. रं. बोराडे यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात निधन झाले. महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील एक पित्रतुल्य व्यक्तिमत्व हरवल्याने लातूरच्या साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली. अनेक साहित्यिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या अशा…
निधनाने मराठवाडा पोरका झाला
प्राचार्य बोराडे सर लातूर जिल्ह्याचे सुपुत्र होते. अस्सल लेखनाच्या सामर्थ्याने मराठवाड्याच्या सीमा ओलांडून मराठी साहित्य प्रवाहात आपले स्थान पक्के केले.ग्रामीण मन, मानसिकता, रूढी परंपरा याचे सूक्ष्म निरीक्षण त्यांच्या साहित्यातून आले आहे.त्यांची पाचोळा कादंबरी खूप गाजली. लातूर-उस्मानाबाद धाराशिव परिसराची भाषा आणि लोकजीवन,लोकसमज त्यांनी साहित्यात अजरामर केले आहे..बोराडे सरांच्या साहित्यात स्री मनाचे विविध पदर प्रकट होतात.ते मराठवाड्याचे पहिले यशस्वी लेखक असून कथा,कादंबरी, समीक्षा व ग्रामीण नाटिका अशा सर्वच साहित्य प्रकारात लेखन केले.ते सत्तर वर्षे लिहित होते.कोरोना काळावर स्थलांतर नावाची त्यांची कादंबरी आली आहे.त्यांच्या साहित्याने नेहमीच मराठवाड्यातील बदलत्या जीवनाचा शोध घेतला आहे. जडमनाने भावपूर्ण श्रद्धांजली : प्रा. जयद्रथ जाधव.
अष्टपैलू ग्रामीण साहित्यिक हरवले
बोराडे सरांच्या निधनाने साहित्यक्षेत्रात शोककळा पसरली आहे.रावसाहेब रंगनाथराव बोराडे अर्थात रा. रं. बोराडे या नावाने ग्रामीण साहित्य मराठी साहित्यात उज्ज्वल केले. लातूर तालुक्याच्या काटगाव या आडवळणाच्या खेड्यातून एक वळणदार साहित्यिक जन्माला येऊन मराठी सारस्वतात त्यांनी या मातीचे नाते दृढ केले. एक काळ असा होता की, पुणे- मुंबईच्या साहित्यिकाशिवाय आपल्याला पर्याय नव्हता, तिकडच्या पुस्तकाशिवाय वाचक नव्हता. पाचोळा ही कादंबरी काटगावच्या मातीत जन्माला आली व ग्रामीण साहित्य बदलून गेले. पुढे बोराडे सर वैजापूर ,छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी प्राध्यापक, प्राचार्य म्हणून कार्यरत राहिले परंतु त्यांचे लेखन हे सतत ग्रामीण व्यथा वेदनांशी, कष्टक-याच्या मातीशी निगडित राहीले. ते केवळ कथाकारच नव्हते तर कथाकथनकार म्हणून त्यांनी नाव कमवले. शासनाच्या वतीने त्यांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला. तसा हा पुरस्कार द्यायला फार उशीर झाला म्हणावा लागेल. फार उशिरा दाखल घेतली गेली. पण एवढे खरे की बोराडे सरांना जीवन गौरव दिल्यामुळे या पुरस्काराचाच सन्मान वाढला आहे. ग्रामीण साहित्यातील चौफेर लेखन करणारा अष्टपैलू साहित्यिक हरवल्याचे दु:ख शब्दांच्या पलीकडचे आहे. : भारत सातपुते , लातूर
सृजन जाणीवा त्यांनी समृद्ध सर
आज महाराष्ट्राने खूप मोठा ग्रामीण कथाकार गमावला केवळ कथाकार नव्हे तर एक अत्यंत संवेदनशील भावनिक मतीशी नात जोडणारे प्राचार्य रा. रं. बोराडे यांची विद्यार्थ्याप्रती प्रचंड आपुलकी होती. ग्रामीण आत्मकथन शिबिर’,‘विद्यार्थी नवलेखक शिबिर’, ‘विद्यार्थीनी नवलेखिका शिबिर’,‘लोककला कौशल्य विकास शिबिर’ यासारख्या राज्यपातळीवरील शिबिरांच्या आयोजनाबरोबरच मान्यवर साहित्यिकांच्या प्रत्यक्ष भेटींमधून विद्यार्थ्यांमधील सृजन जाणीवा त्यांनी समृद्ध केल्या अधिकाधिक नवलेखक साहित्यिक त्यानी घडविले. गुरुवर्य रा. रं. बोराडे यांच्या काटगाव लातुरमधिल अनेक आठवनी कायम येत राहतील. सराना भावपूर्ण श्रद्धांजली: डॉ. उमाकांत जाधव, सदस्य -मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगर.
मोठा माणूस, मोठा साहित्यिक गेला…
ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण कथाकार, प्राचार्य रा. रं. बोराडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. साहित्य क्षेत्रात मानाचा समजला जाणारा वि. दा. करंदीकर जनस्थान पुरस्कार त्यांना नुकताच जाहीर झाला होता. तो स्वीकारण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. माझ्या शालेय जीवनामध्ये त्यांची प्रसिद्ध अशी ‘पाचोळा’ नावाची कादंबरी वाचण्यात आली. या एका पुस्तकाने माझ्या आयुष्यामध्ये खूप खूप मोठा बदल झाला. माझ्या जीवनाच्या जडणघडणीमध्ये आदरणीय बोराडे सरांच्या या ‘पाचोळा’ कादंबरीला खूप मोठे महत्त्व आहे. : प्रा बाबासाहेब सोनवणे, लातूर
सरांमुळेच लिहिता झालो
ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे म्हणजे माझ्यासाठ मार्गदर्शन कराणारे हक्काचे व्यक्तिमत्व. जेव्हा जेव्हा त्यांची प्रत्यक्षात भेट व्हायची तेव्हा तेव्हा त्यांनी कसा आहेस, अशी विचारपुस केली की, दुसरं वाक्य असायचं सध्या काय लिहितोयस. लिखाण कसे असावे, याबाबत ते सतत मार्गदर्शन करायचे. अस्सल ग्रामीण कथाकार असलेल्या सरांमुळेच मी लिहिता झालो. त्यांच्या जाण्याचे माझे खुप मोठे नुकसान झाले. : प्रा. बसवराज करकेली, लातूर.