16.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeलातूरलातूर जिल्हा शांतताप्रिय; मोर्चे, आंदोलने कायद्याच्या चौकटीत व्हावीत

लातूर जिल्हा शांतताप्रिय; मोर्चे, आंदोलने कायद्याच्या चौकटीत व्हावीत

लातूर : प्रतिनिधी

जिल्हा हा शांतताप्रिय आहे, ही शांतता कायम राहावी, यासाठी कोणतेही आंदोलन, मोर्चे करतांना कायद्याच्या चौकटीत व्हावेत. त्या आंदोलनात किंवा मोर्चात समाजकंटक, गुन्हेगार घुसणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन नांदेड परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शशिकांत महावरकर यांनी केले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे, जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर महानगरपालिकेचे आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे, अपर जिल्हाधिकारी सुनील यादव, अपर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अजय देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख, विविध संघटनाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक परंपरा आहे. त्यामुळे हा जिल्हा नेहमीच शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. अशा या जिल्ह्याची जिल्हाधिकारी म्हणून मला अभिमान वाटतो, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जिल्ह्यात २४ लाख मराठा कुणबी नोंदी बाबतचे अभिलेख्यांची पडताळणी केल्याचे सांगून भूमी अभिलेख्यातील गावनमुना क्रमांक ३३, ३४ शोधण्याचे काम लातूर जिल्ह्याने केले. त्यानंतर अनेक जिल्ह्यात या गावनमुना क्रमांकात नोंदी सापडल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात या नोंदणी शोधण्याचे काम सुरुच राहणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. लातूर जिल्ह्यातील शांतता अबाधित राहिल, याची आपण काळजी घेऊ, तुमच्या सर्वांचे सहकार्य मागच्या काळातही प्रशासनाला राहिले आहे, यापुढेही तुमचे असेच सहकार्य अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.

लातूर जिल्ह्यात सर्व जाती-धर्मातील लोक सोहर्दाने राहत आहेत. एकादशी, गणेशोत्सव यासह मुस्लीम सणही जिल्ह्यात शांततेत साजरे झाले आहेत. तसेच मराठा, लिंगायत समाजासह सर्वच मोर्चे शांततेने निघाले आहेत. यापुढेही सर्वांनी पोलीस प्रशासनाला असेच सहकार्य करावे. कोणीही अचानक, प्रशासनाला माहिती न देता आंदोलन, मोर्चे काढू नयेत. तसेच या मोर्चे, आंदोलनापासून समाजकंटकांना दूर ठेवावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केले. सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्य पोस्ट पाठवू किंवा फॉरवर्ड करु नयेत. विशेषत: युवा वर्गाने सोशल मीडिया हाताळताना काळजी घ्यावी. पालकांनी आपल्या मुलांच्या सोशल मीडियावर लक्ष ठेवून त्यांच्याकडून कोणतेही चुकीचे संदेश व्हायरल होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, असे आवाहनही मुंडे यांनी यावेळी केले. अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR