37.5 C
Latur
Saturday, April 26, 2025
Homeमहाराष्ट्रलातूर विमानतळाचा विकास करणार : मुख्यमंत्री

लातूर विमानतळाचा विकास करणार : मुख्यमंत्री

शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड, अमरावती विमानतळाचा विस्तार करणार 
मुंबई : प्रतिनिधी 
आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळ येथे २ हेलिपॅड व ८ वाहनतळ उभारण्यास व विमानतळाचे विस्तारीकरण, अद्ययावतीकरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता दिली. अमरावती विमानतळाच्या धावपट्टीच्या विस्तारीकरणाचा आराखडा सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. लातूर विमानतळाचाही विकास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाच्या संचालक मंडळाची  बैठक सह्याद्री अतिथीगृहातील सभागृहात झाली. या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. अमरावती येथे उद्योगाचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत असल्याने या ठिकाणची धावपट्टी वाढविणे आवश्यक आहे तसेच या विमानतळापासून महसूल मिळविण्यासाठीचा आराखडा तयार करावा, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी नमूद केले.
लातूर जिल्ह्याचा सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास व विस्तार होत आहे त्यामुळे लातूर विमानतळ महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी या विमानतळाचा विकास करण्यात यावा. या विमानतळाचा लातूरसह बीड, धाराशिव या जिल्ह्यांनाही लाभ होईल. तसेच कराड येथील विमानतळाचे काम वेगाने सुरू करून तेथे नाईट लँडिगची सुविधा निर्माण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. चंद्रपूर येथील विमानतळावर चार्टड विमाने उतरू शकतील, अशी सुविधा तयार करण्यासाठी तेथील धावपट्टी वाढविण्यात यावी. गडचिरोली येथील विमानतळासाठी २ ते ३ पर्यायी जागांचा विचार करण्याच्या
सूचनाही त्यांनी दिल्या.
 शिर्डी विमानतळाचा
गतीने विकास करणार
शिर्डी येथील विमानतळाच्या कार्गो टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. नाशिकपासून शिर्डी विमानतळ जवळ असल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या वेळेस हवाई मार्गेने येणा-या भाविकांना शिर्डी विमानतळ सोयीचे होणार आहे. त्या वेळी होणा-या संभाव्य गर्दीचा विचार करून व नाशिक येथील विमानतळाची क्षमता लक्षात घेता शिर्डी विमानतळ विस्तारीकरणाच्या प्रस्तावास या वेळी मान्यता देण्यात आली. यामध्ये ८ वाहनतळे, २ हेलिपॅड यासह टर्मिनलच्या अद्ययावतीकरणाचा समावेश आहे. याचा फायदा कुंभमेळ्यादरम्यान येणा-या विमाने व हेलिकॉप्टर सेवेसाठी होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR