लातूर : प्रतिनिधी
मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे यासह मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या उपोषणास पाठींबा म्हणुन सकल मराठा समाजाच्या वतीने दि. २३ सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला लातूर शहरासह जिल्हा भरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लातूर कडकडीत बंद होते. शाळा, महाविद्यालयेही भरली नाहीत. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण आमच्या हक्काचे’, ‘मराठा आरक्षणाचा बालेकिल्ला लातूर जिल्हा लातूर जिल्हा’, अशा घोषनांनी आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला होता.
सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समाजबांधव जमले. शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले व त्यानंतर शहरभर आंदोलकांनी मोटारसायकल फेरी काढत बंदचे आवाहन केले. या बंदबाबत पूर्व कल्पना देण्यात आल्याने दुकाने उघडण्यात आली नव्हती. शाळा- महाविद्यालये कडकडीत बंद होती. एरवी विद्यार्थ्यांनी गजबजलेल्या ट्युशन परिसरात शुकशुकाट होता. मार्केट यार्ड परिसरातही असेच चित्र होते. शहराचे -हदय समजल्या जाणा-या गंजगोलाईतील व्यवहार ठप्प होते. कापड लाईन, भुसार लाईन सराफा बाजार येथेही शुकशुकाट होता.
मराठा आंदोलकांच्या सतत शहरात मोटारसायकल फे-या सुरु होत्या. गंजगोलाईतील जगदंबा मंदिरासमोर रस्त्यावरच बराच काळ मराठा बांधवांनी बैठक दिली होती. मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करुनही सत्ताधारी व विरोधी हा विषय गांर्भियाने घेत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त्त करण्यात आली. सरकारचा निषेध करण्यात आला. मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे, निजाम गॅझेटीअर लागू करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.