26.4 C
Latur
Sunday, December 22, 2024
Homeलातूरलोकशाहीची हत्या लोकशाही माध्यमातूनच होतेय 

लोकशाहीची हत्या लोकशाही माध्यमातूनच होतेय 

लातूर : प्रतिनिधी
लोकशाही वाचविण्याच्या कसोटीतील एक सामना हरला. परंतू, मालिका अद्याप शिल्लक आहे. मात्र लोकशाहीची हत्या लोकशाही माध्यमातूनच होत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत असून तमाम भाारतीयांनी लोकशाहीच्या आव्हानांना सामोरे जाऊन लोकशाही वाचविण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन भारतातील ज्येष्ठ राजकीय  विश्लेषक तथा सामाजिक कार्यकर्ते प्रा. योगेंद्र यादव यांनी केले.
मराठवाडयातील पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ अ‍ॅड. मनोहराव गोमारे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अ‍ॅड. मनोहराव गोमारे पुरोगामी विचार मंच लातूरच्या वतीने दि. २१ डिसेंबर रोजी सायंकाळी येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित अ‍ॅड. मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्कार वितरण तसेच ‘भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने व भवितव्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना प्रा. योगेंद्र यादव बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे होते. प्रमुख पाहूणे म्हणून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची उपस्थिती होती. विचार मंचावर अ‍ॅड. मनोहरराव गोमारे पुरोगामी विचार मंच लातूरचे समन्वयक प्रा. डॉ. नागोराव कुंभार, सुभाष लोमटे, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, डॉ. गणेश गोमारे यांची उपस्थिती होती.
लोकशाहीसमोर दररोज नवनवीन आव्हाने येत आहेत. त्याला स्वत:पुर्ते न पाहता जागतिक दृष्टीकोनातून विचार झाला पाहिजे, असे नमुद करुन प्रा. योगेंद्र यादव पुढे म्हणाले, २० व्या शतकात सैनिक गणवेशात कोणीतर टीव्हवर, रेडिओवर यायचा आणि उद्यापासून लोकशाही संपली, आता मार्शल लॉ असेल, अशी घोषणा करुन खुल्यापणाने लोकशाहीची हत्या व्हायची. मात्र २१ व्या शतकातील लोकशाहीच्या हत्येचे स्वरुप बदलले आहे. गाजावाजा करुन, जनता जनार्दनाची प्रशंसा करुन लोकशाही जिंदाबादच्या घोषणा देऊन लोकशाहीची हत्या केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्पसारखा माणुस दुस-यांदा निवडून येतो आणि तो अमेरिकेचा राष्ट्रध्यक्ष होतो. त्यामुळे आता अमेरिकेने लोकशाहीवर भाषण देणे बंद करावे. जगातील इतर काही देशांमध्येही लोकशाहीची हत्या होताना दिसून येत आहे. त्यात भारतही मागे नाही, असेही प्रा. योगेंद्र यादव म्हणाले.
या समारंभात प्रा. योगेंंद्र यादव यांना अ‍ॅड. मनोहरराव गोमारे राष्ट्रीय पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. प्रारंभी अ‍ॅड. मनोहरराव गोमारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. गणेश गोमारे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉक्युमेंट्रीद्वारे अ‍ॅड. मनोहरराव गोमारे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. प्रास्ताविक भाऊसाहेब उमाटे यांनी केले. पाहूण्यांचे स्वागत डॉ. बी. आर. पाटील, शिवाजीराव शिंदे, अ‍ॅड. उदय गवारे, माधव बावगे, प्रा. डॉ. दशरथ भिसे यांनी केले. कवी वशिष्ठ अनुप लिखीत प्रेरणा गीत उत्तरेश्वर बिरादार व रुक्साना मुल्ला यांनी गायिले. सुत्रसंचालन पर्णवी ढवारे व रुक्साना मुल्ला यांनी केले. कार्यक्रमास सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR