27.4 C
Latur
Tuesday, January 21, 2025
Homeराष्ट्रीयलोकसभा निवडणुकीत बसपाने भाजप-सपाच्या ४५ जागांवर बिघडवला खेळ

लोकसभा निवडणुकीत बसपाने भाजप-सपाच्या ४५ जागांवर बिघडवला खेळ

लखनौ : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये दुस-या क्रमांकावर असलेल्या बहुजन समाज पक्षाला यावेळी खातेही उघडता आलेले नाही. मात्र, बसपाने यावेळी भाजप आणि इंडिया आघाडीच्या ४५ जागांवर खेळ बिघडवला आहे. यावेळी एनडीए २९३ जागांवर विजय मिळवत सलग तिस-यांदा सरकार स्थापन करणार आहे. तर इंडिया आघाडीला २३४ जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत केंद्रातील सत्ताधारी भाजपला उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये मोठा धक्का बसला आहे. उत्तर प्रदेशात भाजपला केवळ ३३ जागा मिळाल्या, तर विरोधी पक्ष सपा ३७ आणि काँग्रेसला सहा जागांवर विजय मिळाला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत उत्तर प्रदेशचे निवडणूक निकाल यावेळी बरेच बदलले आहेत. २०१९ मध्ये बसपा राज्यात दुस-या क्रमांकावर होता, तर यावेळी पक्षाला खातेही उघडता आले नाही. या निकालांदरम्यान, ८० जागांवर बसपाला किती मते मिळाली हे जाणून घेऊया? विजयापेक्षा किती जागांवर पराभवाचे अंतर कमी आहे आणि किती जागांवर जास्त आहे? बसपाची मते भाजपकडे गेली असती तर काय झाले असते? याचा लेखाजोखा पाहूया.

यूपीमध्ये बसपाची कामगिरी कशी होती?

यावेळी यूपीमध्ये मतांच्या टक्केवारीत बसपा चौथ्या स्थानावर आहे. पक्षाला राज्यात ९.२९ टक्के (८२.३३ लाख) मते मिळाली आहेत. तर गेल्या निवडणुकीत सपासोबत लढणा-या बसपाला यूपीमध्ये १९.४ टक्के मते मिळाली होती. या व्होट बँकेमुळे पक्षाचे १० खासदार विजयी होऊन लोकसभेत पोहोचले होते. मात्र, यावेळी मतांची टक्केवारीही सुमारे १० टक्क्यांनी कमी झाली आणि पक्षाला खातेही उघडता आले नाही.

बसपाने सपाला धक्का दिला की भाजपला?

या निवडणुकीत यूपीमध्ये १४ जागा अशा आहेत जिथे भाजपने विजय मिळवला पण विजयाचे अंतर बसपाला मिळालेल्या मतांपेक्षा कमी आहे. या जागांवर बसपाला मिळालेली मते इंडिया आघाडीकडे गेली असती तर भाजपला या जागाही गमवाव्या लागल्या असत्या. या जागामध्ये अकबरपूर, अलिगड, अमरोहा, बांसगाव, भदोही, देवरिया, फारुखाबाद, फतेहपूर सिक्री, हरदोई, मेरठ, मिश्रीख, फुलपूर,शहाजहानपूर आणि उन्नाव या जागांचा समावेश आहे. तर दुसरीकडे, सपाला विजय मिळालेल्या २८ जागा अशा आहेत जिथे विजयाचे अंतर बसपाला मिळालेल्या मतांपेक्षा कमी होते. या जागांवर बसपाला मिळालेली मते एनडीएकडे गेली असती तर सपाला या जागा गमवाव्या लागल्या असत्या. यामुळे एकही जागा न जिंकता बसपने संपूर्ण यूपीतील ४५ जागांवर एनडीए किंवा इंडिया आघाडीचा खेळ बिघडवला असेच म्हणावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR