चाकूर : प्रतिनिधी
देवणी तालुक्यातील वलांडी येथील एका सहा वर्षाच्या चिमुकलीवर ंिद १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान सतत पाच दिवस एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची अमानवीय घटना घडली असून या घटनेच्या निषेधार्थ दि २९ जानेवारी रोजी चाकूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता.
सकल ंिहदू समाजाच्या वतीने चाकूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बसस्थानक, बोथीरोड, सोसायटी चौक, मज्सीद चौक, जय भवानी चौक येथून जुने बसस्थानक येथे निषेध रॅली काढण्यात आली. ‘फाशी द्या,फाशी द्या आरोपीला फाशी द्या’ च्या घोषणा देत संबंधित घटनेचा निषेध करण्यात आला. चाकूर शहरातील सर्व व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेवत निषेध आंदोलनात सहभागी झाले होते तर शहरातील शाळाही बंद ठेऊन या घटनेचा निषेध करण्यात आला.
आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. या नराधमाविरुद्ध देवणी पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (पोस्को) अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत २५ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान यावेळी चाकूर शहरात पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.